फिल्मस्टार बिगड गए है
By admin | Published: January 10, 2016 01:04 AM2016-01-10T01:04:06+5:302016-01-10T01:04:06+5:30
केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात
औरंगाबाद : केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात यावे, म्हणजे त्यांना त्यांची योग्यता कळेल, असे आव्हान त्यांनी दिले.
देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोपही त्यांनी केला. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय संमेलनानिमित्त उमा भारती शनिवारी औरंगाबादेत आल्या होत्या. भाजपा परिवारातील एका नेत्याने यावर्षी अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम सुरू होईल, असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या, राममंदिराविषयी कुणी वक्तव्य केले असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. दिल्ली विद्यापीठात सुब्रह्मण्यम स्वामींना प्रवेश करण्यापासून अडविले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे तर काय आहे. आमीर खानची सुरक्षा काढली म्हणून आमच्याकडे खुलासा मागितला जातो. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा कमी-अधिक केली जाते. तरीही सरकारला दोषी ठरविले जाते. (प्रतिनिधी)
नोकरशाहीची नकारात्मता
बाहेरच्या चांगल्या गोष्टी बघून आमच्यात प्रचंड ऊर्जा संचारते. त्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्रही त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवितो. मंत्रालयात पोहोचल्यावर आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. थंड डोक्याचे नकारात्मक विचारांचे अधिकारी ती गोष्ट कशी होऊ शकत नाही, याच्या कारणांचा पाढाच वाचतात, असे भारती यांनी सांगितले. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) आयोजित पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय परिषदेत देशातील ९० पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.