तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:42 AM2023-06-24T06:42:56+5:302023-06-24T06:43:18+5:30
ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, ४,६४४ जागांसाठीची जाहिरात महसूल व वन विभागाने प्रकाशित केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून, त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ पर्यंत आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी हा htpp://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर जाहीर केला जाणार असून, उमेदवारांना तो प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
ऑनलाइन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत.
यापूर्वी सरकारने वारंवार तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. तलाठी भरती रखडल्याने भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता, तर दुसरीकडे तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संबंधित कामांचा खोळंबा होत होता.
अनेक रोजगार
अनेक महिन्यांपासून आम्ही मंत्रालय स्तरावर तलाठी भरतीसाठी पाठपुरावा करीत होतो. त्याला आज यश आले असून, उमेदवारांची तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली आहे. या माध्यमातून अनेक उमेदवारांना रोजगार मिळणार आहे.
- महेश घरबुडे,
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती