आंबेत बौद्धवाडीला जोडणारा साकव मोजतोय शेवटची घटका
By admin | Published: June 5, 2017 02:59 AM2017-06-05T02:59:52+5:302017-06-05T02:59:52+5:30
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या गावामध्ये त्यांच्याच कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास येथील नागरिकांचा येत्या पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची शक्यात वर्तविली जात आहे.
तब्बल ३५ वर्षांपूर्वी ८०च्या दशकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले असताना, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाचे काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसामध्ये या पुलाच्या मधला भाग व पिलर तुटला होता. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सरपंच सरस्वती आंबेकर, ग्रामसेवक राहुल घोडके व ग्रामस्थांनी तक्र ारदेखील केली होती. साकव पुलाला तुटून एक वर्ष होत आले, तरी वरिष्ठांकडून दुरु स्तीसाठी कोणत्याही प्रकारची दखल अद्याप घेतली नसल्याचे समजते.
आंबेत मोहल्ल्यात रोजगारासाठी घरकाम करणाऱ्या महिला व मजुरीसाठी जाणारे नागरिक तसेच आता शाळांची घंटा पुन्हा वाजणार असून, विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा वापर करून आपला जीव मुठीत घेऊन साकव पार करावा लागत आहे. या साकवाची एवढी दुरवस्था झाली आहे की तो कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. या साकवाच्या पिलरला हि तडे गेले आहेत.
पावसाळ्यात हा साकव पूल कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला बांधकाम विभाग पूणपणे जबाबदार राहील आणि संबंधितांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या या साकवची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी आंबेत बौद्धजन मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.