राणी बागेतील प्रवेश शुल्कात अखेर वाढ
By Admin | Published: May 26, 2017 08:00 PM2017-05-26T20:00:57+5:302017-05-26T20:00:57+5:30
भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात प्रस्तावित दरवाढीला विरोध होत असल्याने शिवसेनेने दर कमी करण्याची तयारी दाखवली.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात प्रस्तावित दरवाढीला विरोध होत असल्याने शिवसेनेने दर कमी करण्याची तयारी दाखवली. मात्र, केवळ प्रौढांसाठी सुचवलेले प्रत्येकी शंभर रुपये दर ५० रुपयांवर आणण्याची खेळी शिवसेनेने केली. त्यात भाजपाचा लटका विरोध आणि काँग्रेसच्या समर्थनामुळे दरवाढीच्या या प्रस्तावाला बहुमताच्या जोरावर स्थायी समितीच्या बैठकीत आज हिरवा कंदील मिळाला. ही दरवाढ रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाहरेकऱ्यांनी सभात्यागावरच समाधान मानले. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या महासभेपुढे पाठवण्यात येणार आहे. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
राणीबागेचा प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढवण्यात आला. मात्र त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणी बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध सुरू केला. याचा फायदा उठवत भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. भाजपाचे संख्याबळ समान असल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेल्यास नाचक्की होईल, याची शिवसेनेला धास्ती वाटू लागली. त्यामुळे दरवाढीवर फेरविचार करण्यास शिवसेनेने सुरुवात केली.
त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव आज आला असता शिवसेनेने दर कमी करण्याची उपसूचना मांडली. त्याप्रमाणे प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये दर ५० वर आणण्यात आले. मात्र कुटुंबासाठी प्रवेश दर व राणी बागेत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांकरीता सुचवण्यात आलेले प्रवेश शुल्क तेवढेच ठेवण्यात आले. राणी बागेचे काम अद्याप अर्धवट असताना ही दरववाढ योग्य नाही, सुविधा देत नाही तर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना शुल्क का? असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. समाजवादीने हा प्रस्ताव परत पाठवून द्या, अशी सूचना केली. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने समर्थन दिले. यामुळे बळ मिळालेल्या शिवसेनेने या विषयावर मतदान घेऊन बहुमताने प्रस्ताव मंजूर केला.
- राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भाजपचा विरोध सुरु झाल्याने स्थायी समितीमध्ये वादळी चर्चेचे संकेत होते. मात्र शिवसेनेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव रोखता आला नाही. उपसूचना मांडून हा प्रस्ताव लटकावण्याचेही भाजपाला सुचले नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजप आणि समाजवादी पक्षाने सभात्याग करून समाधान मानले.
कधीपासून दरवाढ...
स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या महासभेत पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तिथेही मंजुरी मिळाल्यानंतर त्या महिन्याच्या नंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे.
- पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणी बागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आखाडा ३५ हजारपर्यंत पोहोचतो. असा पालिकेचा दावा आहे. मात्र राणीच्या बागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे.
असे आहेत दरात बदल....
राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क -
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १०० रुपयांऐवजी ५० रुपये
- तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
- अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी शंभरऐवजी ५०रुपये.
शालेय विद्यार्थ्यांसाठी -
- पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
- खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपये.
- खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.
- सकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५0 रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या ववेळेत फेरफटका बंद.
- ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
- फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
- व्हिडिओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी -
- १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
- तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : दोनशे रुपये