अंतिम लढत बरोबरीत
By admin | Published: April 29, 2016 02:14 AM2016-04-29T02:14:40+5:302016-04-29T02:14:40+5:30
वाकड गावचे ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त झालेल्या निकाली कुस्ती आखाड्यात सुमारे तासभर चाललेली अंतिम लढत बरोबरीत सुटली.
वाकड : वाकड गावचे ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त झालेल्या निकाली कुस्ती आखाड्यात सुमारे तासभर चाललेली अंतिम लढत बरोबरीत सुटली. इंदोरचा हिंदकेसरी पैलवान रोहित पटेल व दिल्लीचा भारतकेसरी परवेश कुमार यांच्यात अटीतटीची व चुरशीची लढत झाली. दोन्ही मल्लांनी डाव-प्रतिडावांनी नवीन उभारण्यात आलेला आखाडा गाजविला.
म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त प्रथमच निकाली कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले. राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष मयूर कलाटे यांच्या पुढाकाराने व वाकड ग्रामस्थांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी म्हातोबा मंदिर पायथ्याशी स्वतंत्र आखाडा उभारण्यात आला होता. त्यातील अनेक चुरशीच्या लढतींनी प्रचंड गर्दी केलेल्या कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली. उत्सव कमिटीने यंदा निवडक निकाली कुस्त्यांचे आयोजन केले होते. देशातील नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्याने स्पर्धेला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते.
हिंदकेसरी गणपत आंधळकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले, हभप रविकांतमहाराज वसेकर, वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जे. शेख यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. या वेळी रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी युद्धवीरसिंग, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी नगरसेवक विठ्ठल काटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल उपस्थित होते.
या वेळी वाकड ग्रामस्थांच्या वतीने हिंद केसरी आंदळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम विजेत्यांना दोन लाख रुपयांचे इनाम देण्यात आले. निवेदक बाबा लिमण यांनी आखाड्याचे सूत्रसंचालन केले.
एकूण चाळीस निकाली कुस्त्या लावण्यात आल्या. चुरशीच्या निकाली कुस्त्या पुढीलप्रमाणे : महेश मोहोळ विरुद्ध समाधान घोडके (विजयी), समीर कोळेकर विरुद्ध सचिन येलभर (विजयी), साईनाथ रानवडे विरुद्ध देवा घोडके (विजयी). समीर देसाई विरुद्ध विक्रम वडितले ही लढत बरोबरीत सुटली. (वार्ताहर)