जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Published: June 10, 2016 01:21 AM2016-06-10T01:21:48+5:302016-06-10T01:21:48+5:30
उजनी धरणातील बॅकवॉटरमधून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राजेगाव : परिसरात उजनी धरणातील बॅकवॉटरमधून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदा प्रथमच राजेगाव परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उजनी धरणातील बॅकवॉटरमधून पाणीउपसा करण्यासाठी करावयाच्या जलवाहिनी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही, तरीही यंदा वरुणराजा बरसेल आणि उजनी धरण १०० टक्के भरेल, हा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांना उजनी धरणाचे बॅकवॉटर वरदान ठरले आहे. १९७६ साली उजनी धरण झाल्यानंतर या भागातील काळ्याभोर पिकाऊ (मळशीच्या) जमिनी पाण्याखाली गेल्याने या परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. परंतु, नंतर शेतकऱ्यांनी उजनी धरणातील बॅकवॉटरमधील पाण्यावर जलवाहिनी टाकून कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली.
त्यामुळे या परिसरातील शेतकरी हळूहळू सधन होऊ लागला. सुरुवातीला पाच-दहा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जलवाहिन्या टाकल्या. नंतर कालांतराने प्रत्येकाने स्वतंत्र जलवाहिन्या टाकल्या.
या दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढत जाऊन एका शेतकऱ्यांने दोन-दोन जलवाहिनी टाकल्याचे दिसून आले. एकट्या राजेगावमध्ये जवळपास ३०० ते ३५० जलवाहिन्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
राजेगाव येथील शेतकरी शशिकांत वाघमारे म्हणाले, की यंदा भीमा नदी कोरडी पडली आहे तरीही यंदा चांगला पाऊस पडून उजनी धरण १०० टक्के भरेल, याची आशा वाटते. आम्ही पाच इंच आकाराच्या ८०० पाईप टाकून जुन्या राजेगाव ते कोशिमघरपर्यंत पाईपलाईन केली आहे. साधारणपणे त्यासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.