कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात
By admin | Published: April 18, 2017 05:40 AM2017-04-18T05:40:32+5:302017-04-18T05:40:32+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात सोमवारी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात सोमवारी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन सरतपासणी झाली़ सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत २६ साक्षीदारांची तपासणी झाली आहे़ अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी सांगितले़
खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अॅड़ उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़ गवारे यांनी अत्याचार व खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली.
कोपर्डी घटनेतील आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला १५ जुलै रोजी अटक करण्यात आली़ त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले़ त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या जबाबानंतर या घटनेत संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली़ शिंदे याच्या घराची झडती घेतली, तेव्हा तेथे मोबाईल व काही अश्लिल सीडी आढळून आल्या़ (प्रतिनिधी)