ठाण्यातील ‘त्या’ महिला खेळाडूंचे अखेर निलंबन
By admin | Published: May 17, 2016 04:24 AM2016-05-17T04:24:35+5:302016-05-17T04:24:35+5:30
द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटनेने ठाणे संघातील आठ महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई केली
मुंबई : ठाणे जिल्हा फुटबॉल संघातील महिला खेळाडूंनी पुरुष छायाचित्रकाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात, द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटनेने ठाणे संघातील आठ महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई केली आहे. ठाणे संघातील पाच खेळाडंूवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून, तीन खेळाडूंवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेला २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे सामने कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात आले होते. २ मे रोजी झालेल्या धुळे विरुद्ध नागपूर सामन्यात ठाणे संघातली महिला खेळाडूंनी सामना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटना आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याच वेळी छायाचित्रकार पुष्पक शिरवाडकर आपले कर्तव्य बजावत असताना त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
ठाणे संघातील पूजा मोरे, नम्रता ठाकूर, स्नेहल मंचेकर, सुरभी मांजरेकर आणि दीपिका मसूरकर या पाच खेळाडूंवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी तत्काळ लागू करण्यात येत असून, आगामी पाच वर्षांसाठी फुटबॉलसंबंधी कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येणार नाही. उर्वरित श्रृती नायर, झील ठक्कर, अक्षया वेंकठगिरी यांनाही दोषी ठरवत, त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, ठाणे संघाला २ लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवाय येत्या १५ दिवसांत कारवाई का करू नये? याबाबत ठाणे संघाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. (प्रतिनिधी)