अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:12 PM2020-08-31T16:12:20+5:302020-08-31T16:45:46+5:30
UGC Final Tear Exam सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांना जर परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी युजीसीकडून ती मान्य़ करून घ्यावी, असे म्हटले होते.
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
रविवारी कुलगुरु समितीच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पद्धतीने परीक्षा घेता येईल याची चाचपणी करण्यात आली. यानंतर आज दुपारी सरकारकडे या समितीने अहवाल सोपविला. यावर निर्णय घेण्यात आला असून सप्टेंबरचा पूर्ण महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरु होतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.
या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार आहोत. यासाठी कमी मार्कांची परीक्षा होईल. 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची युजीसीला विनंती करणार आहोत. यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची दोन -तीन दिवसात बैठक घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांना जर परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी युजीसीकडून ती मान्य़ करून घ्यावी, असे म्हटले होते. यानुसार राज्य सरकार युजीसीकडे यासंबंधी चर्चा करणार आहे. युजीसीने सध्या 31 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे सांगितले होते. तसेच परिक्षेचे स्वरूप ठरविण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर पडण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी दिले आहे.