अखेर कृषी विद्यापीठाने गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’चा उल्लेख वगळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:47 AM2020-07-15T04:47:34+5:302020-07-15T06:12:02+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती.
अमरावती : कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला असून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोरोनाचा उल्लेख करण्याचा निर्णय कोणी घेतला, याची चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. मात्र, ‘लोकमत’ंने ही बातमी प्रकाशित करून कृ षी विद्यापीठांचे मनसुबे हाणून पाडले. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागातील गुणपत्रिकेच्या फारमॅटवरून ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख वगळण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने चारही कृषी विद्यापीठांना करणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
महाविद्यालयांना नोटिसा
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिकेवर उल्लेख केल्याबद्दल कृषी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. वास्तविक, ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का कृषी विद्यापीठानेच पाठविला असताना महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवरील उल्लेख वगळला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येतील. तसे कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागाने कळविले आहे.
- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज आॅफ हॉर्टिकल्चर
.............................