कोकणातील एसी डबल डेकरला अखेर २२ आॅगस्टचा मुहूर्त
By admin | Published: August 14, 2014 03:37 AM2014-08-14T03:37:58+5:302014-08-14T03:37:58+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बाप्पा पावला आहे
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बाप्पा पावला आहे. कोकणवासीयांसाठी असलेली एसी डबल डेकर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, २२ आॅगस्टपासून ही ट्रेन प्रीमिअम विशेष म्हणून एलटीटी ते करमाळी अशी धावेल. या ट्रेनच्या २0 फेऱ्या होणार आहेत. मात्र या ट्रेनच्या तिकीट आरक्षणाची तारीख निश्चित करण्यात आली नसून, ती लवकरच करण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
एसी डबल डेकर ट्रेन कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात सुरू होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत ही ट्रेन ‘हॉलीडे स्पेशल’ म्हणून चालवण्यास सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेने २२ आॅगस्टपासून ही ट्रेन विशेष ट्रेन म्हणून एलटीटी ते करमाळी अशी चालवण्याचा निर्णय घेतला. एसी डबल डेकर 0२00५ ट्रेन एलटीटी येथून २२, २४, २६, २८, ३0 आॅगस्ट आणि १, ३, ५,७, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी साडेचार वाजता पोहोचेल.
तर 0२00६ ट्रेन करमाळी येथून २३, २५, २७, २९, ३१ आॅगस्ट आणि २, ४, ६, ८ आणि १0 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुटेल, तर त्याच दिवशी करमाळी येथे १७.४0 वाजता पोहोचेल.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मध्य रेल्वेकडून खास भेटच देण्यात आली आहे. ही ट्रेन गणेशोत्सवातच कोकणवासीयांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात
होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. (प्रतिनिधी)