अखेर बेस्ट भाडेकपात
By admin | Published: June 8, 2016 03:29 AM2016-06-08T03:29:03+5:302016-06-08T03:29:03+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बेस्टच्या बस भाड्यात कपात करण्याच्या भाजपाच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आज फसले़
मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बेस्टच्या बस भाड्यात कपात करण्याच्या भाजपाच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आज फसले़ महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर पिठासीन अधिकारी बनताच बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून आज मंजूर करण्यात आला. त्यामुळे बेस्ट समितीमध्ये मंजूर होऊन तब्बल एक महिना उलटल्यानंतर पालिका महासभेत या भाडेकपातीवर शिक्कामोर्तब आज झाले.त्यानुसार साध्या आणि वातानुकूलित बसपास व वातानुकूलित बसभाड्यात कपात होणार आहे़
बस भाड्यात कपात करण्याची घोषणा करीत गेल्या महिन्यात भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला़ त्यानंतर गेला महिनाभर भाडेकपातीचा प्रस्ताव पालिका महासभेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता़ हे भाडेकपातीचे श्रेय भाजपाच्या खिशात जाणार असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येते़ बस मार्गांमध्ये नव्या टप्प्यांचा समावेश करून भाडे कमी केल्याचे भाजपा भासवत असल्याचाही आरोप करण्यात येत होता़ ही कपात म्हणजे धूळफेक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आज केला़ मात्र महापौर स्नेहल आंबेकर या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या गैरहजेरीत उपमहापौर अलका केरकर पिठासीन अधिकारी होत्या़ हीच संधी साधून भाजपाने ही भाडेकपात पालिकेच्या महासभेत आज मंजूर करून घेतली़ त्यानुसार वातानुकूलित बसभाड्यात ५० टक्के कपात, दैनंदिन पास दोनशे रुपयांवरून दीडशे रुपये तर मासिक व त्रैमासिक पासाच्या रकमेत ३० ते १२५ रुपये कपात झाली आहे़ (प्रतिनिधी)
>भाडेकपातीमध्ये उत्पन्नात घट
बसभाड्यांमध्ये कपात केल्यानंतर दररोज बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात चार लाख ६१ हजार रुपयांची घट होणार आहे़ त्यामुळे या बसगाड्यांचे दररोज २२ हजार ३३५ प्रवासी वाढविणे आवश्यक आहे़
बस पासमध्ये ३० दिवसांऐवजी २२ दिवसांचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत़ तर त्रैमासिक पास ९०ऐवजी ६६ दिवसांचा असणार आहे़ मासिक व त्रैमासिक बसगाड्यांच्या भाड्यात कपात केल्यामुळे दररोज चार लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे या मार्गावर दररोज ५५५ जादा प्रवासी मिळण्याची गरज आहे़
वातानुकूलित बसगाड्यांचा दैनंदिन पास दोनशे रुपयांऐवजी दीडशे रुपये, मासिक बसपास ४८००वरून ३३०० रुपये तर त्रैमासिक पास ९९०० रुपयांचा असणार आहे़ या भाडेकपातीमुळे एक लाख ६० हजार रुपये उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे आणखी २४०० प्रवासी वाढविण्याची गरज आहे़