अखेर कपिल शर्मावर गुन्हा दाखल
By admin | Published: September 20, 2016 04:50 AM2016-09-20T04:50:13+5:302016-09-20T04:50:13+5:30
महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचे ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्यावर अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
मुंबई : मुंबईतील महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचे ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्यावर अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील वल्लभभाई पटेल नगरात तिवरांची कत्तल करून अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी तहसिलदार कार्यालयातील तलाठ्यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे.
कपिल शर्माने गेल्या आठवड्यात महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने कार्यालयावरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचे ‘व्टिट’ केले होते. त्याचबरोबर गेली तीन वर्षे १५ कोटी रुपये कर भरत असूनही आपल्याकडे लाच मागितली जाते, हेच का अच्छे दिन?, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान मोदी यांना केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटले होते.
प्रत्यक्षात कपिलने अंधेरी (प.) येथील म्हाडा कॉलनीतील चार नंबरच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम केले होते. तिवरांच्या सुमारे एक हजार चौरस फुट जागेवर अतिक्रमण करून कार्यालय उभारले होते. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती. त्याच्या ‘ टिष्ट्वट’नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत वनविभागाकडून अहवाल मागविला. त्यांनी अंधेरी तहसिलदार कार्यालयाला दिलेल्या अहवालात तिवरांची कत्तल केल्याचे नमूद केले होते. तलाठ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
>कपिल शर्माने चार बंगला परिसरातील ही जागा ७ नोव्हेंबर २०१५ मध्ये बरान आदर्श याच्यांकडून खरेदी केली आहे. त्यानंतर हजारो तिवरे तोडून खड्डा भरला. त्यावर अनाधिकृत बांधकाम केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.