अखेर उल्हासनगरच्या दाराविना शौचालयाला दरवाजे; नागरिकांची कुचंबणा थांबली, व्यक्त केले समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:12 PM2021-10-31T17:12:18+5:302021-10-31T17:13:23+5:30
दरवाजे विना असलेल्या सार्वजनिक शौचालयाला अखेर महापालिकेने दरवाजे बसविल्याने, नागरिकांची कुचंबना थांबली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ खेमानी हनुमाननगर मधील दरवाजे विना असलेल्या सार्वजनिक शौचालयाला अखेर महापालिकेने दरवाजे बसविल्याने, नागरिकांची कुचंबना थांबली. दरवाजे विना शौचालयात स्थानिक नागरिकांवर छत्रीचा आडोसा घेवून नैसर्गिक विधी करण्याची वेळ आली होती.
उल्हासनगर महापालिका स्वच्छ व सुंदर शहर मोहिमे अंतर्गत कोट्यवधींचा निधीतून शौचालयाची देखरेख, नुतनीकरण, पुनर्बांधणी दरवर्षी करते. मात्र महापालिका प्रभाग क्रं-७ मधील हनुमाननगर मधील सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नसल्याने, नागरिकांना छत्रीचा आडोसा घेऊन नैसर्गिक विधी पार पाडवा लागतो. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी उघड केल्यावर, एकच खळबळ उडाली. दरम्यान महापालिका आरोग्य विभागाने शौचालयाचे नुतनीकरण व दुरुस्ती करण्याच्या निविदा निघाल्या असून लवकरच शौचालयाला दरवाजे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. स्थानिक नगरसेविका व प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती शुभांगी निकम यांनी शौचालयाचे दरवाजे चोरीला गेल्याचे म्हटले होते. तर दुसरे स्थानिक नगरसेवक व उपमहापौर भगवान भालेराव यांनी शौचालयांची लवकरच दुरुस्ती होणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
महापालिका सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नसल्याने, नागरिकांची कुचंबणा होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, महापालिका आरोग्य विभागाला जाग आली. अखेर शौचालयाला दारे बसविल्याने, नागरिकांची कुचंबनेतून सुटका झाली असून गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी महापालिका आरोग्य व बांधकाम विभागाने मूलभूत व अत्यावश्यक कामाकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी महापालिकेकडे केली.