अखेर सॅनिटरी नॅपकिनवरील GST हटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:11 PM2018-07-21T18:11:19+5:302018-07-21T18:32:18+5:30
सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटववण्यात आला आहे.
मुंबई - सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटववण्यात आला आहे. जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची मागणी मंजूर करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिली आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकीनच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी कौन्सिलची आज 28 वी बैठक पार पडली. 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. सॅनिटरी नॅपकीवर याआधी १२ टक्के कर आकारण्यात येत होता.
सॅनेटरी नॅपकिन्सला वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात यावे यासाठी महाराष्ट्राच्यावतीने मी अर्थमंत्री म्हणून वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रही मागणी केली होती. आज या पाठपुराव्याला यश मिळाले असून सॅनेटरी नॅपकिन्सवरील कर दर शून्य करण्यात आला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महिलांच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय होणे खूप महत्वाचे होते. आज ही मागणी मान्य केल्याबद्दल आपण केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल यांचे आभारी आहोत असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
याच बैठकीत बांबू फ्लोअरिंग वरचा १८ टक्क्यांचा कर दर १२ टक्के करण्यात आला. बांबू उद्योगाच्या वृद्धीसाठी हा निर्णय ही खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्यावतीने ही मागणीही वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रहाने मांडण्यात आली होती. आज राज्याची ही मागणी पूर्ण झाल्याचे समाधान आहे असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.