अखेर इमान अबुधाबीला रवाना..!
By admin | Published: May 5, 2017 04:24 AM2017-05-05T04:24:54+5:302017-05-05T04:24:54+5:30
चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल केलेल्या जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला
मुंबई : चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल केलेल्या जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय इमानला ११ फेब्रुवारी रोजी कार्गो विमानातून क्रेनच्या साहाय्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर ८२ दिवसांनंतर पुढील उपचारांसाठी ती आज अबुधाबीला रवाना झाली.
इमानला मुंबई विमानतळावर नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. या वेळी, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी, डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि डॉ. अपर्णा भास्कर आदी उपस्थित होते. ५०० किलो वजन असलेल्या इमानवर सैफी रुग्णालयात केलेल्या उपचारांमुळे तिचे तीन महिन्यांत ३३० किलो वजन कमी झाले. आता तिचे वजन १७६ किलो असून, तिच्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची, तसेच विशेष विमानाची सुविधा गुरुवारी देण्यात आली होती.
अबुधाबी येथील रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक इमानला पाहण्यासाठी मुंबईतही आले होते. याच रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार होणार असून, तिच्यासोबत बुर्जिल रुग्णालयातील नऊ डॉक्टर, परिचारिका आणि इतर अशा एकूण १३ जणांच्या टीमचा समावेश होता. इजिप्तसाठीचा प्रवास इमान एअरबस ३००ने करणार असल्याचेही सांगण्यात आले. इमानला सैफी रुग्णालयासह मुंबईकरांनीही निरोप दिला. (प्रतिनिधी)
इमानला मुंबई विमानतळावर नेण्यासाठी गुरुवारी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी, डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि डॉ. अपर्णा भास्कर आदी उपस्थित होते. या वेळी इमानच्या उपचारांवरून डॉक्टरांशी अनेकदा वाद घालणारी इमानची बहीण शायमा हिनेही इमानवर उपचार करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले.
1 - विमान प्रवासाठी इमान फीट असल्याचे सैफी रुग्णालयातील बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. अपर्णा भास्कर यांनी सांगितले. या विमानात कोणत्याही विशेष सुविधा करण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सामान्य विमानाचे प्रवेशद्वार लहान असल्याने इमानसाठी विशेष विमान केल्याचे बुर्जिल रुग्णालयाकडून सांगण्यात आले. याच रुग्णालयाकडून तिची काळजी घेतली जाणार आहे.
2 - इमानवर सुरू असलेल्या उपचारांचा तपशील या डॉक्टरांनी जाणून घेतला होता. इमानवर उपचार करण्यात आलेल्या २८ पानांचा तपासणी अहवाल बॅरिएट्रिक सर्जन डॉ. मुजफ्फल लकडावाला यांनी अबुधाबी येथून आलेल्या डॉक्टरांना दिला. अबुधाबी येथील उपचारांनंतर इमानला चालता येणेही शक्य होईल, असे तिची बहीण शायमा हिने सांगितले.
कर्मचाऱ्यांनी दिले चॉकलेट्स अन् गुलाब
सैफी रुग्णालय प्रशासनाने खास डिझाइन केलेला गुलाबी रंगांचा ड्रेस परिधान करुन गुरुवारी दुपारी सगळ्यांचे आभार मानून इमान अबुधाबीच्या प्रवासाला निघाली. याप्रसंगी, रुग्णालयाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी इमानला गुलाबांची फुले आणि चॉकलेट्स देऊन निरोप दिला. या वेळी, या सगळ्यांच्या डोळ्यांत इमानसोबत निर्माण झालेल्या जिव्हाळा आणि आपुलकीचे दर्शन झाले.
पोलीस-पत्रकारांत वाद
गुरुवारी दुपारी १२.१५च्या दरम्यान वाजता इमानला बाहेर आणण्यापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या तळमजल्यावरील परिसरात प्रवेश दिला. रुग्णालय प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना परवानगी दिल्यानंतरही पोलीस मात्र त्यांना मज्जाव करीत होते. या वेळी काही वेळासाठी पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये जुंपली. काही वेळ शाब्दिक बाचाबाचीही झाली; परंतु अखेर रुग्णालय प्रशासन व्यवस्थापकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळले.
‘इमान’सारख्या प्रकरणांसाठी विशेष धोरण
इमानसारख्या प्रकरणांसाठी भविष्यात विशेष वैद्यकीय धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यात कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा, कशा प्रकारे त्याचा मसुदा असावा याविषयी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जेणेकरुन, भविष्यात अशा प्रकरणांमध्ये देश आणि राज्यस्तरीय यंत्रणांच्या भूमिका ठरवता येतील. त्याचप्रमाणे, इमान अहमदच्या प्रकरणात महाराष्ट्रातील डॉक्टरांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असून, त्या सर्वांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
स्वाक्षरीसाठी अडवणूक नाही
इमान अहमदच्या डिस्चार्ज पेपरवर तिची बहीण स्वाक्षरी करण्यासाठी अडवणूक करत होती, ही पूर्णपणे अफवा आहे. कोणत्याही रुग्णालयातील रुग्णाची केस ‘हँडओव्हर’ करताना काही कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात, त्यामुळे काहीसा उशीर झाला. शिवाय, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनाही इमानला निरोप देण्यासाठी यायचे होते, त्यांची वाट पाहत होतो, असे बेरिएॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले.
अबुधाबी प्रशासनाची जबाबदारी नाही
मज्जासंस्था व फिजिओथेरपीच्या पुढील उपचारांसाठी ती अबुधाबीच्या बुर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. मात्र तेथील प्रशासनाने इमानची जबाबदारी घेतली नसल्याची माहिती गुरुवारी सैफी रुग्णालयात उपस्थित इजिप्तच्या दूतावास अधिकाऱ्यांनी दिली.