...अखेर बालचित्रवाणी पडद्याआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 05:50 AM2016-09-13T05:50:27+5:302016-09-13T05:50:27+5:30

राज्यातील एका पिढीचे बालपण समृद्ध केलेली बालचित्रवाणी आता पडद्याआड होणार आहे. दूरदर्शनसाठी बालगोपाळांसाठी अभिनव कार्यक्रमांची निमिर्ती करणारी ही संस्था काळाच्या ओघात

Finally, the infant screening! | ...अखेर बालचित्रवाणी पडद्याआड!

...अखेर बालचित्रवाणी पडद्याआड!

Next

पुणे : राज्यातील एका पिढीचे बालपण समृद्ध केलेली बालचित्रवाणी आता पडद्याआड होणार आहे. दूरदर्शनसाठी बालगोपाळांसाठी अभिनव कार्यक्रमांची निमिर्ती करणारी ही संस्था काळाच्या ओघात अडचणीत सापडली होती. बालचित्रवाणीचे पुढे काय होणार, याबाबत अनेक वर्षांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही’, अशा स्पष्ट शब्दांत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी बंद करण्यात येणार असल्याचे सोमवारी स्पष्टपणे सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, की राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी हे युनिट आता ई-लर्निंग म्हणून जगविणे गरजेचे आहे. त्याला योग्य अधिकार दिले पाहिजेत. पण बालचित्रवाणी ज्या नियमाने बनले आहे, त्यातून ते होणार नाही. त्यामुळे बालभारतीबरोबर एकत्र करून ते करता आले तर बालभारतीचा नफा सुरूवातीला त्यामध्ये देता येईल. त्यानंतर दोन वर्षांनी बालचित्रवाणी जो बालभारतीचा ई-लर्निंग विभाग होईल, तो स्वत:चे उत्पन्न मिळवू शकेल. आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच वाहिनीवर चालत नाही. त्यामुळे ई-लर्निंग विभाग सुरू केला तर कालांतराने अजून २० वर्षांनी बालभारतीचा छपाई विभाग बंद होईल आणि ई-लर्निंगच चालेल. त्यामुळे आपण पुढे जाऊन विचार केला पाहिजे.
एखाद्या संस्थेबाबत उगाचच भावनिक होवून त्या संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती कशी बदलून टिकविता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता येईल, यावर माझा जोर आहे. मागील काही महिन्यांपासून थकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे आदेश देण्यात आले असून ती प्रक्रिया सुरू आहे. तेथील कर्मचारी टिकविणे, त्यांना बदलत्या काळानुसार प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे, असे तावडे यांनी सांगितले. 

दूरदर्शनवरील प्रक्षेपण २०१४ पासूनच बंद
केंद्र सरकारने १९८४ मध्ये महाराष्ट्रासह देशातील ६ राज्यांमध्ये बालचित्रवाणीची स्थापना केली. तेव्हापासून पुण्यात सेनापती बापट मार्गावर ही संस्था डौलात उभी होती. मातृभाषेतून मनोरंजन करत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडविणे हा या संस्थेचा उद्देश होता.
त्यानुसार संस्थेने निर्माण केलेले कार्यक्रम त्यावेळी एकमेव दिसणाऱ्या दूरदर्शनवर प्रसारीत होत होते. त्यावर एका पिढीचे बालपण समृद्ध झाले. सुरूवातीला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून संस्थेला निधी मिळत होता. स्थापनेनंतर ५ वर्षांनी राज्य शासनाने संस्थेची पूर्ण जबाबदारी घ्यायची असा निर्णय झाला होता. काही राज्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ही जबाबदारी घेतली होती. काळाच्या ओघात बालचित्रवाणीचे दूरदर्शनवर प्रक्षेपण फेब्रुवारी २०१४ पासून बंद झाले होते. सध्या संस्थेत एकूण ८८ कर्मचारी-अधिकारी आहेत.

Web Title: Finally, the infant screening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.