अखेर मच्छीमार्केटमधील कचरा केडीएमसीनं उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:55 PM2021-06-14T20:55:34+5:302021-06-14T20:56:01+5:30
याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची केडीएमसीन त्वरित दखल घेतली असून, मच्छीमार्केटमधील कचरा उचलला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण:कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड केडीएमसी प्रशासनानं बंद केले. मात्र शहरात अनेक ठिकाणी कच-याचे ढीग दिसून येतात. कचरा वेळेत उचलला न गेल्यानं मच्छीमार्केटची अवस्था बिकट झाली आहे. कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छीमार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः अळ्यांचे साम्राज्य पसरले. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची केडीएमसीन त्वरित दखल घेतली असून, मच्छीमार्केटमधील कचरा उचलला आहे.
कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्यासंबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली होती. तसेच हा सर्व कचरा सडू लागल्यानं पांढऱ्या रंगाच्या मोठ्या अळ्याही झाल्या होत्या. याबाबत विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
कच-याच्या समस्येमुळे ग्राहकांनीही मार्केटकडे पाठ फिरवली होती. मात्र, हा कचरा आता उचलण्यात आल्याचं घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच विक्रेत्यांकडून हा सर्व कचरा एकत्र करून दिला जात होता, असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे मच्छिचा कचरा वेगळा व इतर कचरा वेगळा करून देण्याबाबत विक्रेत्यांना सूचना देण्यात येणार असल्याचही ते म्हणाले. सर्व मच्छीमार्केटमध्ये अशा प्रकारच्या सूचना यागोदरच देणं आवश्यक होतं. मात्र, यापुढे अशी समस्या इतर कोणत्याही मार्केटमध्ये निर्माण होण्याच्या अगोदर केडीएमसी प्रशासनानं विक्रेत्यांशी योग्य तो संवाद साधणं गरजेच आहे.