Police Recruitment 2019 : बहुप्रतीक्षित पोलीस भरती जाहीर : राज्यात महापोर्टलद्वारे प्रथमच होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:45 AM2019-08-31T10:45:53+5:302019-08-31T10:50:40+5:30
Jobs in Police Department: राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे...
बारामती : अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरती एकदाची जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ठेवली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागाने मोठे अभूतपूर्व बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे राज्यात होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे.
गृहविभागाने पोलीस भरती परीक्षेत मोठे बदल केले आहेत. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे. यामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेचे घटक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. सामान्यज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार आहे. मैदानी चाचणी परीक्षेतदेखील अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे. तसेच मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत. मुलांसाठी ठेवलेल्या ५० गुणांच्या मैदानी परीक्षेत ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० गुणांचा समावेश आहे, तर मुलींसाठी ठेवलेल्या मैदानी परीक्षेत मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे लेखी परीक्षेतील १०० गुण आणि मैदानी चाचणीतील ५० गुण अशा एकूण १५० गुणांतून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ ) व भारत राखीव बटालियन (आयआरबी) या पदांसाठी मात्र १०० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये ५ किलोमीटर धावणे, १०० मीटर धावणे या प्रकारांचा समावेश आहे. १०० गुण लेखी परीक्षेसाठी व १०० गुण मैदानी चाचणीसाठी अशा २०० गुणांतून एसआरपीएफ आणि आयआरबीच्या पदांसाठी निवड करण्यात येणार आहे.
..........
उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र
राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने मोठे अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार पोलीस शिपाई सेवा प्रवेश २०१२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
........
२००६ पासून नियमितपणे पोलीस भरती प्रक्रिया होत आहे. मात्र, यंदा पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळणारा उत्साह यंदा दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे ही परीक्षा महापोर्टलकडे देण्यात आली आहे. महापोर्टलमार्फत घेण्यात येणाºया सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आदी शासकीय परीक्षांचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांमध्ये अनुत्साह आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. राज्यातून जवळपास ८ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. - उमेश रुपनवर, सह्याद्री अॅकॅडमी
.....