अखेर पालघरच्या ‘त्या’ एपीआयची बदली रद्द
By Admin | Published: April 26, 2017 02:04 AM2017-04-26T02:04:55+5:302017-04-26T02:04:55+5:30
खंडणीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या तपास अधिकारी व पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा
मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या तपास अधिकारी व पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक प्रशांत लांगी यांची परस्पर करण्यात आलेली बदली अखेर रद्द केली आहे. कोकण परिमंडळ विभागाचे विशेष महानिरीक्षक प्रशांत बुगडे यांनी सोमवारी रात्री बदलीचे आदेश मागे घेतले.
लांगी यांनी अटक आरोपीला वसई न्यायालयात हजर करत असताना आपल्यावर केलेली कारवाई न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. महत्वाच्या गुन्ह्याचा तपास प्रलंबित असताना बुरडे यांनी त्यांची तडकाफडकी बदली केल्याने पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुुरु होती. सोशल मीडियावरुन त्याचे मॅसेज ‘व्हायरल’ झाले होते.
पालघर जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ता व पत्रकार असल्याच्या बुरख्याखाली माहिती गोळा करुन विविध अधिकारी, उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या डॉ. शरद यादववर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला पालघरमधील शिवसेनेच्या नगरसेवकाची साथ असल्याची चर्चा आहे.
यादवला अटक झाल्यास आपण अडचणीत येण्याच्या भीतीने त्या नगरसेवकाकडून प्रयत्न सुरु होते. यादव हा उत्तर प्रदेशला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर लांगी हे १७ एप्रिलला तिकडे रवाना झाले होते. त्याचा शोध करीत असतानाच विशेष महानिरीक्षक बुरडे यांनी १९ एप्रिलला तपास अधिकारी लांगी यांची ‘एलसीबी’तून पुढील आदेशापर्यंत पोलीस नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश काढले होते. (प्रतिनिधी)