महाराष्ट्रातील ‘पँथर’ अखेर नरेंद्र मोदी सरकारचा राज्यमंत्री
By admin | Published: July 6, 2016 02:13 AM2016-07-06T02:13:42+5:302016-07-06T02:13:42+5:30
दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली : दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे.
जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर आठवलेंच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात आंबेडकर चळवळीतल्या रिपब्लिकन नेत्याचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मंत्रिमंडळात आठवलेंनी कॅबिनेट मंत्रिपदही भूषवले होते.
रा.सु.गवई बिहार व केरळचे राज्यपाल होते. मात्र केंद्रात ते मंत्री होऊ शकले नाहीत. आर. डी. भंडारे राज्यपाल होते. विश्वनाथ प्रतापसिंगांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा सदस्यत्व दिले. काँग्रेसच्या सहकार्याने ते लोकसभेवरही निवडून आले. मात्र केंद्रात त्यांना संधी मिळाली नाही. मोदी सरकारने आठवलेंना मंत्री केल्याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र सदनात बौद्ध भिख्खू व आठवलेसमर्थकांची गर्दी होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा वेध घेत आठवले यांनी भाजपशी घरोबा केला. जातीयवादी, मनुवादी म्हणून ज्यांच्याविरोधात लढाई केली त्यांच्याच मांडवात जाऊन आठवले यांनी जाणे अनेकांना रुचले नव्हते. पण आठवलेंना वाऱ्याची दिशा कळली होती. मोदी लाटेत महायुतीचे चांगभले झाले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले. बक्षिसी म्हणून आठवलेंच्या गळ्यात खासदारकी पडली. आणि दोन वर्षात आठवले मंत्री झाले!
राज्यमंत्रिपदाची शपथ घेताना आठवले इतके भावनाविवश झाले की त्यामुळे ते अडखळत होते. ते स्वत:चे नाव घ्यायलाही विसरले. राष्ट्रपतींनी त्यांना आठवण करून दिल्यानंतर मात्र आठवले सावरले. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही आठवले म्हणाले, ज्या पक्षाचे मी प्रतिनिधित्व करतो, त्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. डॉ. आंबेडकरांमुळेच हे मंत्रिपद माझ्या वाट्याला आले आहे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण मंत्रिपरिषदेत मंत्री आहोत. भाजपमध्ये माझ्या पक्षाचे कधीही विलिनीकरण होणार नाही. तसा आग्रह कोणी केला तर मी मंत्रिपदाचा राजीनामाच देईन. माझ्या विभागाचे काम मी निष्ठेने करीन. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हे माझे स्वप्न आहे. त्याचे अध्यक्षपद भूषवण्याच्या स्पर्धेत मी नाही.
‘संविधान’ सार्थक
आठवले यांनी आपल्या मुंबईतील घराला ‘संविधान’ असे समर्पक नाव दिले आहे. यावर ते एकदा म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले म्हणूनच माझ्यासारख्या फाटक्या माणसाचं घर झालं!
कपड्यांचा शौक
रामदास आठवले यांना रंगबेरंगी कपड्यांचा भारी शौक. तेच त्यांचं फॅशन स्टेटमेन्ट बनलं आहे. माणसांनी आपल्या स्वभावासारखे कपडे घालावेत, उगीच सुटाबुटात राहून स्वत:ला जंटलमन भासवू नये. माझा स्वभाव मोकळाढाकळा आहे. त्यामुळे तसेच कपडे घालतो, असं आठवले म्हणतात.