अखेर १०४ सहायक आयुक्तांना पोस्टिंग !
By Admin | Published: October 2, 2016 12:18 AM2016-10-02T00:18:36+5:302016-10-02T00:18:36+5:30
गेल्या महिन्याभरापासून पदोन्नती मिळूनही पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १०४ सहायक पोलीस आयुक्त/ उपअधीक्षकांच्या नियुक्तीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून पदोन्नती मिळूनही पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १०४ सहायक पोलीस आयुक्त/ उपअधीक्षकांच्या नियुक्तीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. त्यांच्या विविध घटकात नियुक्तीचे आदेश शनिवारी गृह विभागाकडून बजाविण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई आयुक्तालयातील ३१ अधिकाऱ्यांना अन्य घटकांत पाठविण्यात आले आहे. तर ११ जणांना मुंबईत संधी देण्यात आली आहे.
बहुतांश अधिकाऱ्यांना नवरात्रोत्सवानंतर नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी ‘रिलीव्ह’ केले जाईल, असे वरिष्ट अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आठ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या १०४ वरिष्ठ निरीक्षकांना गेल्या एक सप्टेंबरला सहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती. मात्र त्यांच्या नवनियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्यात आलेले नव्हते. गणेशोत्सव, बकरी ईद निमित्त बंदोबस्तात व्यस्त असल्याने पोस्टिंग रखडले होते. त्याबाबत पोलीस अस्थापना मंडळ क्रं.१ची २६ सप्टेंबरला बैठक झाली. त्यानंतर शनिवारी १०४ जणांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. (प्रतिनिधी)