अखेर साई पक्षाची घटना सादर
By admin | Published: April 4, 2017 04:14 AM2017-04-04T04:14:46+5:302017-04-04T04:14:46+5:30
कोकण विभागीय आयुक्तांकडे अखेर साई पक्षाने पक्षाची घटना सादर केली
उल्हासनगर: कोकण विभागीय आयुक्तांकडे अखेर साई पक्षाने पक्षाची घटना सादर केली, तर शिवसेनेने उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले. शिवसेनेच्या तक्रारीवरून कोकण विभागीय आयुक्तांनी घटना सादर न केल्याचे कारण देऊन साई पक्षाच्या गटाची नोंदणी शनिवारी रद्द केली होती.
उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक बुधवार, ५ एप्रिल रोजी आहे. महापौरपदावरून भाजपा व शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून घोडेबाजाराला ऊत आला आहे. एकेका मताकरिता २५ लाख रुपये मोजण्याची तयारी दाखवली जात आहे. साई पक्षाने गट नोंदणीच्यावेळी पक्षाची घटना सादर केली नाही, असा आक्षेप शिवसेनेने घेऊन त्यांच्या गटाची नोंदणी रद्द करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्ताकडे केली होती.
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शिवसेनेचा आक्षेप ग्राह्य धरत साई पक्षाची गटनोंदणी रद्द केली. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवर व्हिप बंधनकारक होत नाही. तसेच त्या पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद धोक्यात आले. याप्रकाराने भाजपा गोटात खळबळ उडाली.
आपल्यावरील कारवाईविरुद्ध साई पक्ष न्यायालयात जाईल, अशी शंका शिवसेनेला असल्याने शिवसेना शहरप्रमुखांनी उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे. सोमवारी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे जाऊन पक्षाची घटना सादर केली. आता विभागीय आयुक्त पक्षाच्या गटाला महापौर निवडणुकीपूर्वी मान्यता देणार असल्याची
माहिती इदनानी यांनी दिली. त्याचबरोबर पक्षाच्या स्वीकृत नगरसेवकपदावरही गंडांतर येणार नसल्याचे ते म्हणाले. आता विभागीय आयुक्त कोणती भूमिका घेतात, याकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
५ एप्रिल रोजी महापौर निवडणुकीच्या वेळी पंचम कलानी यांच्यासह २१ नगरसेवक सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच सध्या चव्हाण कलानी यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
ओमी टीमला स्थायी समिती सभापतीपदासह सव्वा वर्षाने महापौरपदाचे आश्वासन दिल्याचे समजते. कलानी व मनोज लासी यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याने नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे.
कलानी समर्थकांत असंतोष
ओमी टीमची नाराजी दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची दमछाक झाली आहे. ओमी टीममुळे भाजपाचे ३३ नगरसेवक निवडून आले. मात्र, तरीही भाजपाने महापौरपदाचा दिलेला शब्द न पाळल्याने कलानी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.