अखेर दहीहंडीवरील विघ्न टळले- अॅड. आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 08:21 PM2017-08-07T20:21:24+5:302017-08-07T20:21:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवत गोविंदांचे वय 18 वरून 14 वर्ष केले आहे.
मुंबई, दि. 7 - मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवत गोविंदांचे वय 18 वरून 14 वर्ष केले आहे. न्यायालयात भाजप सरकारने उत्सव मंडळांची बाजू सकारात्मकरीत्या मांडली होती. त्यामुळेच हा मोठा विजय झाला. उत्सवप्रेमींना न्याय मिळाला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा भावना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
दहीहंडीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. गेली दोन वर्षे यासाठी विविध स्तरावर आमदार अॅड. आशिष शेलार पाठपुरावा करत होते. सुनावणीदरम्यान आमदार अॅड. आशिष शेलार न्यायालयात स्वतः हजर होते. तसेच समन्वय समितीचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पदाधिका-यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आमदार आशिष शेलार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आशिष शेलारांसोबत गीता झगडे, बाळा पडेलकर, भोईर, पांचाळ आदींचा समावेश होता.
भाजपा सरकारने सुरक्षेचे नियम पाळून उत्सव झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अॅड. तुषार मेहता यांची नियुक्ती केली. तसेच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यासोबतच नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून उत्सवाबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
विशेष बाब म्हणजे न्यायालयात सरकारने गोविंदांच्या सुरक्षेबाबत काटेकोर काळजी कशी घेतली जाईल, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच 14 वर्षांची अट ही कामगार कायद्यातील बालकामगार प्रतिबंधक तरतुदीनुसार सरकारच्या वतीने अॅड. तुषार मेहता यांनी मांडून गोविंदाचे वयाची अट 18 ऐवजी 14 असायला हवी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ती न्यायालयाने ग्राह्य धरली. या सर्व बाजू सरकारतर्फे अभ्यासपूर्ण न्यायालयात मांडल्या गेल्या म्हणूनच हा न्याय मिळाला, असेही आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले.