अखेर एसटी कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:36 AM2022-01-02T05:36:53+5:302022-01-02T05:37:08+5:30
विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसात कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मुंबईत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सायंकाळी पाचनंतर मैदान सोडण्याचा सूचना मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या सूचनेचा मान ठेवत संपकरी कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर पडले आहेत. पण उद्या पुन्हा हे कामगार आंदोलन करणार आहेत.
विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहाटे ५ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देण्यात आलेली आहे; मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्यभरातून आणि खेड्यापाड्यातून कर्मचारी आले असल्याने रात्री त्यांना आझाद मैदानावर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पण कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य सरकारने रात्री जमावबंदीही लागू केलेली आहे. त्यानुसार मुंबईतील आझाद मैदानमधील आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना मैदानातून सायंकाळनंतर बाहेर काढण्यात आले.