‘सायन्स एक्स्प्रेस’ला अखेर रायगडमध्ये थांबा
By admin | Published: July 15, 2017 05:15 AM2017-07-15T05:15:44+5:302017-07-15T05:15:44+5:30
केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : विज्ञान प्रसाराकरिता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. १६ डब्यांची ही विशेष विज्ञान ट्रेन कोकणात केवळ रत्नागिरी व मुंबई येथे थांबणार होती. परिणामी, रायगडमधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासू या सायन्स एक्स्प्रेसच्या बौद्धिक लाभास वंचित राहाणार होते. ही बाब गुरुवारी लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ई-मेल करून लक्षात आणून दिली. ही ट्रेन रायगडमध्ये एक दिवस थांबविण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’ची ही विनंती मान्य करून मंगळवारी १८ जुलै रोजी सायन्स एक्स्प्रेस रायगडवासीयांकरिता रोहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांचे कार्यालयीन सचिव सुधीर भालेराव यांनी ‘लोकमत’ला फोन करून दिली आहे.
सायन्स एक्स्प्रेसचा १८ जुलै रोजीचा संपूर्ण कार्यक्रम लोकमत कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी साकेत मिश्रा यांनी कळविले आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही सायन्स एक्स्प्रेस रत्नागिरी येथे १४ ते १७ जुलै या कालावधीत थांबून थेट मुंबईत १९ ते २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे थांबणार आहे. मात्र आता यात बदल करून ती रायगडमध्ये रोहा रेल्वे स्थानकावर १८ जुलै रोजी थांबणार असल्याने रायगडवासीयांना या सायन्स एक्झिबिशनचा लाभ घेता येणार आहे. सायन्स एक्स्प्रेस पाहण्याकरिता कोणतेही शुल्क नाही.
>आॅक्टोबर २००७ मध्ये सुरुवात
आॅक्टोबर २००७मध्ये भारत भ्रमणास प्रारंभ केलेल्या या १६ वातानुकूलित डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत १७४६ दिवसांत १ लाख ५६ हजार कि.मी. प्रवास केला आहे. यादरम्यान देशातील ५०७ रेल्वे स्थानकांवर
१ कोटी ६८ लाख विज्ञान जिज्ञासू व विद्यार्थ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक दर्शक संख्या लाभलेल्या सायन्स एक्स्प्रेसची लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये १२ वेळा नोंद झाली असल्याची माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.