अखेर ‘सायन्स एक्स्प्रेस’ला थांबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:02 AM2017-07-22T01:02:14+5:302017-07-22T01:02:14+5:30
अकोल्यात २८ ला सायन्स एक्सप्रेस : ‘लोकमत’चा पाठपुरावा आणि खासदारांच्या प्रयत्नांना यश
राम देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा यासाठी ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने २८ जुलै रोजी ‘सायन्स एक्स्प्रेस’ला ‘मॉडेल’ रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मुर्तिजापूरच्या विद्यार्थ्याना लाभ मिळाला होता आता अकोल्यातील विद्यार्थी सायन्स एक्सप्रेसचा लाभ घेऊ शकतील.
जागतिक पर्यावरण बदलाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभ्रमंतीवर निघालेली ‘सायन्स एक्स्प्रेस’ १४ जुलै रोजी रत्नागिरी मार्गे राज्यात दाखल झाली. त्यानंतर या गाडीतील प्रदर्शन पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रायगडवासीयांची मनीषा ‘लोकमत’ने समोर आणली त्याची रेल्वे मंत्रालयाने दखल घेत १८ जुलै रोजी रोहा या रेल्वेस्थानकावर ही एक्सप्रेस थांबविली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यातील केवळ पाच प्रमुख रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आलेल्या गाडीला २७ ते २९ दरम्यान मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार होते. ‘सायन्स एक्स्प्रेस’ला मूर्तिजापूरऐवजी अकोला रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा ही ‘लोकमत’च्या माध्यमातून पश्चिम वैदर्भीयांनी केलेली मागणी खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मांडली. खासदारांनी केलेल्या विनंतीवरून भारतीय रेल्वे प्रशासनाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २८ जुलै रोजी शिक्षणाचे हब म्हणून नवीन ओळख निर्माण झालेल्या अकोला रेल्वेसथानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या या पाठपुराव्याचा लाभ खान्देशातील नागरिकांनासुद्धा होणार आहे. अकोल्यात पोहोचण्यापूर्वी २७ जुलै रोजी या गडीला धुळे रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मध्य रेल्वेच्या माहिती अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला कळविले आहे.
गतवर्षीच्या प्रवासात जलंब आणि मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर देण्यात आलेल्या थांब्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील व मूर्तिजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या गाडीतील विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला होता.
‘सायन्स एक्स्प्रेस’च्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने केलेल्या नवीन बदलामुळे २८ जुलै रोजी अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व शिक्षकांना रेल्वे रुळावर चालणाऱ्या आगळ्या-वेगळ्या वैज्ञानिक प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला मध्य रेल्वे सल्लागार समिती, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, रेल्वे प्रवासी महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांसह तिन्ही जिल्ह्यातील सामाजिक संस्था व संघटनांचे पाठबळ लाभले.
मूर्तिजापूरच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी सायन्स एक्स्प्रेस अनुभवता आली होती त्यामुळे यावर्षी अकोल्यातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने लाभ होणार आहे. विज्ञानाचा प्रसार-प्रचार हा सर्व स्तरामध्ये झाला पाहिजे, त्यामुळे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना या एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा.
- खा. संजय धोत्रे