अखेर गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:35 IST2024-12-16T11:34:08+5:302024-12-16T11:35:08+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला.

finally the garland of ministerial post fell around neck in mahayuti govt | अखेर गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ...!

अखेर गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ...!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात महायुतीच्या एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २० आमदारांच्या गळ्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ पडल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 

चंद्रशेखर बावनकुळे 

- पक्ष    :    भाजप
- मतदारसंघ    :    कामठी (जि. नागपूर)
- वय     :    ५५
- शिक्षण     :    बी.एससी.

बावनकुळे यांचा भाजप सदस्य ते प्रदेशाध्यक्ष असा ३० वर्षांचा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजपच्या जिल्हा ते प्रदेश या संघटनात्मक पातळीवरील सर्वच पदांचा त्यांना अनुभव आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ते कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडूण आले. जानेवारी २०२२ मध्ये विधान परिषद सदस्य (नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था), २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ विधानसभा सदस्य (आमदार) (विधिमंडळ पंचायतराज, सार्वजनिक उपक्रम व ग्रंथालय समिती सदस्य) पदांवर काम केले. २०१४- २०१९ - मंत्री- ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, मंत्री-राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री, नागपूर. २०१४ ते २०१७ या कालावधित त्यांनी प्रदेश सचिवपद सांभाळले. २०२१ ते २०२२ सरचिटणीस, १२ ऑगस्ट २०२२ पासून भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती.

राधाकृष्ण विखे पाटील

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    शिर्डी (जि. अहिल्यानगर)
- वय     :    ६५
- शिक्षण     :    बी.एस्सी.(कृषी)

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय सुरुवात १ मार्च १९९५ रोजी शिर्डी मतदारसंघातून आमदार म्हणून केली. यानंतर १९९७ ते १९९९ या कालावधीत त्यांनी कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागांचे मंत्रिपद भूषवले. १९९९ तसेच २००४ मध्ये ते पुन्हा निवडून आले. २००९ रोजी त्यांची शालेय शिक्षण, विधी व न्याय मंत्रिपदी निवड झाली, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. १९ नोव्हेंबर २०१० पासून २७ सप्टेंबर २०१४ पर्यंत त्यांनी कृषी व पणन मंत्रिपद तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवत काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपद भूषवले होते. २४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९ पर्यंत ते विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी होते. १५ जून २०१९ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हसन मियाँलाल मुश्रीफ

- पक्ष    :    अ. पवार गट 
- मतदारसंघ    :    कागल (जि. कोल्हापूर)
- वय     :    ७०
- शिक्षण     :    बी. ए. ऑनर्स

मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचे पाच-दहा टक्केही मतदान नाही, अशा कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहावेळा निवडून येणे आणि राज्य मंत्रिमंडळात वेगवेगळी नऊहून अधिक खाती तब्बल १९ वर्षे नुसती सांभाळलीच नव्हे; तर त्या खात्याच्या कारभारावर छाप पाडण्याचे काम केले आहे. १९९९ ते २०२४ असे सहा वेळा ते कागलमधून निवडून आले.  कोल्हापूर जिल्हा बँकेचे ते सर्वाधिक १५ वर्षे अध्यक्ष आहेत. गोकुळ दूध संघ, कोल्हापूर बाजार समितीही त्यांच्या ताब्यात आहे. सामान्य माणसाच्या सेवेसाठी अक्षरश: २४ तास उपलब्ध, आरोग्यसेवा देण्यात पुढे, संजय गांधी योजनेसह विविध निराधार योजनांचा लाभ मिळवून देण्यात भारी आणि काम घेऊन गेलेल्या माणसाला नाराज करायचे नाही, ही त्यांच्या यशाची चतु:सूत्री आहे. त्यांना वगळून कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण करता येत नाही.

चंद्रकांत पाटील

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    कोथरूड (जि. पुणे) 
- वय     :    ६५ 
-शिक्षण     :    बी. कॉम

चंद्रकांत पाटील १९७७-१९८० या दरम्यान विद्यार्थी कार्यकर्ता होते. १९८०-१९९३ पूर्णवेळ कार्यकर्ता व १९९०-१९९३ राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सचिव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई, १९९५-९९ सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोल्हापूर विभाग अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. २००४-२००७ चिटणीस व दक्षिण महाराष्ट्र विभागप्रमुख, प्रदेश भाजप; २००७- २०१० प्रदेश सरचिटणीस, २०१०-२०१५ प्रदेश उपाध्यक्ष, जुलै २०१९ पासून प्रदेशाध्यक्ष, भाजप, २००८-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, विधान परिषद, ऑक्टोबर २०१४ ते ऑक्टोबर २०१९ महसूल व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; २०१४-२०१९ विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून त्यांनी काम केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेवर निवड झाली. ९ ऑगस्ट २०२२ रोजीही मंत्रिपदाची शपथ.

गिरीश महाजन 

- पक्ष    :    भाजप
- मतदारसंघ    :    जामनेर 
- वय     :    ६४ 
- शिक्षण     :    बी.कॉम. 

जामनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गिरीश महाजन हे पहिल्यांदा महाविद्यालय प्रतिनिधी (जीएस) म्हणून निवडून आले. तेथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.  यानंतर सन १९८८ मध्ये ते भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष झाले. १९९३ मध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली.  सन ११९२ ते १९९५ या दरम्यान ते जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंच होते. १९९५ पासून  ते जामनेर मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. २०२४ मध्ये ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री, तर नंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास व पर्यटन मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. 

गुलाबराव पाटील

- पक्ष    :    शिंदेसेना 
- मतदारसंघ    :    जळगाव ग्रामीण
- वय     :    ५८ 
- शिक्षण     :    १२ वी उत्तीर्ण

गुलाबराव पाटील यांनी १९९१ मध्ये पाळधी येथील शिवसेना शाखाप्रमुख म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी पंचायत समिती सदस्य पदापासून राजकारणाला सुरुवात केली. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या आणि आतापर्यंत पाच वेळा आमदार झालेल्या पाटील यांना आता चौथ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. दमदार वक्तृत्वशैलीचा चेहरा म्हणून शिवसेना पक्ष त्यांना संधी देत आला आहे.  २०१६ पासून त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद लाभत आले आहे. जुलै २०१६ मध्ये त्यांना सहकार राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. परभणी, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांनी सांभाळलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री होते. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

गणेश रामचंद्र नाईक

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    ऐरोली (जि. ठाणे)
- वय     :    ७४
- शिक्षण     :    ११ वी 

गणेश नाईक यांनी त्यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू केली. विविध पदांवर त्यांनी काम केले. प्रारंभीच्या काळात कामगार नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेवर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.  १९९० पासून सहा वेळेस आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. १९९५ मध्ये युती सरकारमध्ये वनमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून  निवडून आल्यानंतर दहा वर्षे पर्यावरण, उत्पादन शुल्क व कामगार अशा खात्यांचा कारभारही त्यांंनी सांभाळलेला आहे.  त्यानंतर २००४ ते २०१४ असे सलग दहा वर्षे त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सलग दुसऱ्यांदा ते ऐरोली विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत.

दादा रेशमाबाई दगडू भुसे

- पक्ष    :    शिंदेसेना
- मतदारसंघ    :    मालेगाव बाह्य
- वय     :    ५९ 
- शिक्षण     :    अभियांत्रिकी पदवी

तब्बल सलग पाच वेळा विजयी होऊन शिंदेसेनेचे बिनीचे शिलेदार मानले जाणारे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. कृषिमंत्री, बंदरे व खनिकर्म याबरोबरच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्रिपदांबरोबरच नाशिकचे पालकमंत्रिपदही भुसे यांनी भूषवले आहे.  ६ मार्च १९६५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर बांधकाम विभागात अभियंता म्हणून काही काळ काम केले. पण, सामाजिक कार्यात रस असल्याने अखेरीस त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. २००४ मध्ये दाभाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करीत माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग पाच वेळा ते मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आले आहेत.

संजय दुलीचंद राठोड 

- पक्ष    :    शिवसेना (शिंदे सेना) 
- मतदारसंघ    :    दिग्रस जि. यवतमाळ
- वय     :    ५३ 
- शिक्षण     :    बी.काॅम., बीपीएड

संजय राठोड यांची १९९३ मध्ये राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. सलग १८ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. २००४ मध्ये दारव्हा मतदारसंघातून निवडूण येत ते विधानसभेत पोहोचले. सलग पाच टर्म आमदार असलेल्या संजय राठोड यांनी  तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ रविवारी घेतली. राठोड यांनी २००४ मध्ये काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. २००९ मध्ये दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे पुनर्गठण झाले. यातून दिग्रस मतदारसंघ तयार झाला. संजय देशमुख, वसंतराव घुईखेडकर या दिग्गजांचाही त्यांनी पराभव केला. २०२४ च्या निवडणुकीत दिग्रस विधानसभा मतदारसंघात पुन्हा महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत राठोड निवडूण आले. जिल्ह्यातील या अत्यंत चुरशीचा सामन्याने राज्याचे लक्ष वेधले होते.

धनंजय पंडितराव मुंडे

- पक्ष    :    अ. पवार गट 
- मतदारसंघ    :    परळी (बीड) 
- वय     :    ४९ 
- शिक्षण     :    बीएसएल 

धनंजय मुंडे यांचा जन्म परळीतील नाथरा गावात १५ जुलै १९७५ साली झाला. १९९९ पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. सुरुवातीला विद्यार्थी आघाडीपासून केलेली सुरुवात आता मंत्री पदापर्यंत पोहोचली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी २०१४ ते २०१९ विधान परिषद विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, स्टार प्रचारक, २०१९ ते २०२४ सामाजिक न्याय मंत्री व कृषिमंत्री पद भूषविले आहे. तसेच याच बीडचे पालकमंत्रीही ते होते. याआगोदरही पट्टीवडगाव जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष आणि गटनेते आदी पदे त्यांनी सांभाळलेली आहेत. तसेच भाजपमध्ये असतानाही वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. विविध पदांची जबाबदारी सांभाळल्याने अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 

मंगलप्रभात लोढा 

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    मलबार हिल (मुंबई)
- वय     :    ६९
- शिक्षण     :    बी. कॉम., एल. एल. बी.  

मंगलप्रभात लोढा भारतीय जनता पक्षाचे मलबार विधानसभा मतदारसंघाचे सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. लोढा यांचे शिक्षण जोधपूर (राजस्थान) येथे झाले असून, त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवीसोबतच कायद्याची पदवीही घेतली आहे. गेल्या मंत्रिमंडळात राज्याचे कौशल्य विकासमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून  त्यांनी कार्यभार सांभाळला. कौशल्य विकासाकडे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष आहे. त्यादृष्टीने त्यांनी कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविले, त्याचीही पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे. भाजपने लोढा यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविली होती. लोढा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सहभाग घेण्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामही सातत्याने केले आहे. 

उदय रवींद्र सामंत

- पक्ष    :    शिंदेसेना 
- मतदारसंघ    :    रत्नागिरी
- वय     :    ४८
- शिक्षण     :    अभियांत्रिकी डिप्लोमा

पाचव्यांदा आमदार झालेले उदय सामंत यांनी आता चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. २००४ मध्ये ते सर्वप्रथम रत्नागिरीचे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१३ मध्ये उदय सामंत यांना नगरविकास, वनखाते यासह एकूण नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद देण्यात आले. त्याचवेळी त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विधानसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१८ पासून सव्वा वर्ष ते ‘म्हाडा’चे अध्यक्ष म्हणून काम करत होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. या मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देऊन त्यांनी कार्यक्षम मंत्री म्हणून ठसा उमटवला. 

जयकुमार रावल

- पक्ष    :    भाजप
- मतदारसंघ    :    शिंदखेडा (धुळे)
- वय     :    ४८
- शिक्षण     :    बी.कॉम. 

खान्देशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दोंडाईचा रावल संस्थानात  (राज घराण्यात) जयकुमार रावल यांचा जन्म झाला. सलग पाचव्यांदा भाजपतर्फे निवडून आले आहेत. दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी २००४ मध्ये काँग्रेसने तत्कालीन मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार जयकुमार रावल हे भाजपतर्फे २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात  कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली. त्यांनी रोहयो, पर्यटन, अन्न व औषध, राजशिष्टाचार या खात्यांचा कारभार सांभाळला. २०२४ च्या निवडणुकीत पाचव्यांदा ९६ हजार मताधिक्याने विजयी झाले.

पंकजा गोपिनाथराव मुंडे

- पक्ष    :    भाजप  
- मतदारसंघ    :    विधान परिषद  
- वय     :    ४५
- शिक्षण     :    बी.एस.सी.

पंकजा मुंडे यांचा जन्म परळीतील नाथरा गावात २६ जुलै १९७९ साली झाला. त्यांनी २०१३ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, २०१४ ते २०१९ या काळात ग्रामविकास, जलसंधारण महिला व बालविकास, रोहयो मंत्रिपद सांभाळले. २०२० ला राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षाने  त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. याशिवाय मध्य प्रदेश सह प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले. आता त्या विधान परिषद सदस्य आहेत. यासोबतच पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, एन एच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबईच्या माजी संचालक, दीनदयाळ नागरी सह. बँक लि. अंबाजोगाईच्या संचालक, वैद्यनाथ महिला बचत गट महासंघ परळीच्या अध्यक्ष, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षाही त्या आहेत.

अतुल मोरेश्वर सावे

- पक्ष    :    भाजप
- मतदारसंघ    :    औरंगाबाद पूर्व
- वय     :    ६३
- शिक्षण     :    बी.कॉम.

अतुल सावे यांना तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. २०१९ साली पाच महिन्यांसाठी ते उद्योग राज्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये ९ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांना सहकार व बहुजन कल्याण खाते सांभाळण्याची संधी मिळाली. जून २०२३ मध्ये झालेल्या  मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्याकडील सहकार खाते गेले, तर गृहनिर्माण व बहुजन कल्याण खात्याची जबाबदारी त्यांना मिळाली. उद्योगकर्मी व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी १९९८ ते २००३ पर्यंत भाजपचे शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य या पदावर २००३ ते २००६ पर्यंत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २००६ ते २००९ या काळात ते भाजप जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर भाजप राज्य सरचिटणीस पदावर त्यांनी २००९ ते २०१५ पर्यंत जबाबदारी सांभाळली होती. 

प्रा. डाॅ. अशोक उईके 

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    राळेगाव जि. यवतमाळ
- वय     :    ६० 
- शिक्षण     :    एमएस्सी, पी.एच.डी. 

सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रा. डाॅ. अशोक उईके यांचा प्रवास राहिला आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. काॅंग्रेसचे वसंतराव पुरके यांच्या विजयाची परंपरा खंडित करीत ते २०१४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. १६ जून २०१९ ते १२ नोव्हेंबर २०१९ या काळात ते आदिवासी विकास मंत्री होते. राळेगाव मतदारसंघातील कळंब, मोहदा, बाभूळगाव या परिसरात सामाजिक कार्यातून त्यांनी पुढे राजकीय जीवनाची सुरुवात केली. ते बुलडाणा नगरपरिषद सदस्य होते. त्यानंतर त्यांनी १९९७-९८मध्ये बुलडाणा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. २०१९ च्या मंत्रिमंडळात त्यांना चार महिने आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली होती. जिल्ह्यातून भाजपचे ते पहिले कॅबिनेट मंत्री होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.   

शंभुराज शिवाजीराव देसाई

- पक्ष    :    शिंदेसेना 
- मतदारसंघ    :    पाटण (जि. सातारा)
- वय     :    ५८
- शिक्षण     :    एस. वाय. बी. कॉम.

देसाई यांनी कारकिर्दीची सुरुवात अवघ्या १९ व्या वर्षी सहकार क्षेत्रात पर्दापण करून केली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. देसाई यांनी १९९५ आणि १९९९ मध्ये पाटण विधानसभा निवडणूक लढवली. २००४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना यश मिळाले. २००९ मध्ये मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला. २०१४ मध्ये ते चांगल्या फरकाने निवडून आले. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून अडीच वर्षे काम केले. त्यानंतर महायुतीच्या काळातदेखील अडीच वर्षांत ते उत्पादन शुल्क खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. तसेच सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 

ॲड. आशिष शेलार

- पक्ष    :    भाजप
- मतदारसंघ    :    वांद्रे पश्चिम, मुंबई
- वय     :    ५२
- शिक्षण     :    बीएस.सी., एलएल.बी.

आशिष शेलार हे विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेते आहे.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविल्यानंतर  भाजपमध्ये सक्रियपणे काम सुरू केले. मुंबई महापालिकेत ते दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत. शेलार हे वांद्रे पश्चिम येथून  तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. ते भाजपचे मुंबई अध्यक्षदेखील  आहेत. त्यांचा मुंबईतील प्रश्नांचा चांगला अभ्यास आहे. पक्षाची बाजू ते सातत्याने प्रभावीपणे माध्यमामध्ये मांडत असतात. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला ८२ जागांपर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही काळ त्यांनी शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. भक्कम अनुभव आणि कामाच्या शैलीमुळे त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. 

दत्तात्रय विठोबा भरणे

- पक्ष    :    अ. पवार गट
- मतदारसंघ    :    इंदापूर (जि. पुणे) 
- वय     :    ५६
- शिक्षण     :    बी. कॉम.

भरणे हे १९९२ पासून संचालक, २००३-२००८ चेअरमन, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, इंदापूर; १९९६ पासून संचालक, २००२-२००३ चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. १९९१-१९९९ काँग्रेस पक्षाचे कार्य; १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; २०१२-२०१४ सदस्य व मार्च २०१२ ते सप्टेंबर २०१४ अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद, या काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना समाज कल्याण विभागाचा २०१३ चा ‘अपंग कल्याण राज्य पुरस्कार’ प्राप्त झाला. २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी २०२० पासून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री.

अदिती तटकरे

- पक्ष    :    अ. पवार गट 
- मतदारसंघ    :    श्रीवर्धन (जि. रायगड)
- वय     :    ३६
- शिक्षण     :    एम.ए.

अदिती तटकरे यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. २०१८ साली वरसे जिल्हा परिषद गटातून त्या सदस्य  झाल्या होत्या. त्यानंतर, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. २०१९ मध्ये पहिल्यांदा त्या आमदार म्हणून निवडूण आल्या. तटकरे यांनी २०२४ मध्ये उद्धवसेनेचे अनिल नवगणे यांचा पराभूत करून ८२ हजार मतांनी मतदारसंघात विजय मिळविला. त्या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या भगिनी आहेत.  २०१९ मध्ये त्यांनी राज्यमंत्री आणि रायगडाच्या पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. शिंदेसेना-भाजप सरकार काळात महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री झाल्या. अनेक विकासकामे मंजूर करून आणली. यात लाडकी बहीण योजना त्यांच्या विभागाकडून राबविण्यात आली. याच कार्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले

- पक्ष    :    भाजप 
- मतदारसंघ    :    सातारा
- वय     :    ५१
- शिक्षण     :    बी. कॉम.

शिवेंद्रसिंहराजे भोसले २००४ पासून सलग पाचव्यांदा निवडून आले.  राजघराण्याची उज्ज्वल परंपरा त्यांना लाभली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीमधून ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्येही सातारा-जावळी तालुक्यांतून बहुमताने निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही ४७,८१३ मताधिक्याने निवडून आले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेच्या नावलौकिकात भर टाकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याही ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. ३० जुलै २०१९ रोजी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट २०१९ रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९च्या विधानसभेला भाजपातर्फे ४३,४२४ मताधिक्याने निवडून आले. 
 

Web Title: finally the garland of ministerial post fell around neck in mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.