अखेर अकरा वर्षांनी निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:16 AM2024-05-11T06:16:55+5:302024-05-11T06:17:24+5:30
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजय पुनाळेकरची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता कारण : तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही, सबळ पुरावेच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल तब्बल अकरा वर्षांनंतर लागला. डॉ. दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना विशेष न्यायालयाने जन्मठेप, प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. खून ते आरोपींना शिक्षा हा कालावधी ३९१७ दिवसांचा राहिला.
दंड न भरल्यास एका वर्षाचा साधा कारावास भोगावा लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी जे घडले, त्याने हादरला होता महाराष्ट्र
डॉ. दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर खून करण्यात आला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी पुणे पोलिस, राज्य दहशतवादविरोधी पथक आणि नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या गुन्ह्याचा तपास करून ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (रा. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक केली. तावडेने खुनाचा कट रचला, अंदुरे आणि कळसकर यांनी गोळ्या झाडल्या. भावेने घटनास्थळाची ‘रेकी’ केली आणि पुनाळेकर याने कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, असे दोषारोपपत्र ‘सीबीआय’ने विशेष न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार, १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने पाचही आरोपींवर आरोप निश्चित केले.
आराेपींवर संशय घेण्यास वाव असतानाही उदासीनता
आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास न केल्यामुळे, तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच, यूएपीएचे कलम सिद्ध होऊ शकले नाही, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे.
‘सीबीआय’ने नाेंदविली २० जणांची साक्ष
nआरोपींनी गुन्हा कबूल न केल्याने प्रारंभी न्यायाधीश एस.आर. नावंदर आणि नंतर न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी घेतली. ‘सीबीआय’तर्फे २० साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदविली.
nबचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी घेत दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
उच्च न्यायालयात आव्हान देऊ : डॉ. हमीद दाभोलकर
पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा व्यापक कटाचा भाग आहे, हे आम्ही नव्हे, तर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी वारंवार सांगितले आहे. बहुतांश वेळा व्यापक कटातील सूत्रधार मोकळे सुटतात आणि प्याद्यांना बळीचा बकरा बनविले जाते. त्यामुळे सूत्रधारांना पकडण्यासाठी ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ.
अंदुरेच्या पत्नीला अश्रू अनावर
न्यायालयात निकालावेळी आरोपी सचिन अंदुरे याची पत्नी उपस्थित होती. अंदुरे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर अंदुरेच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.
विशेष न्यायालयाच्या या निकालाबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णतः असमाधानी आहे. तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचलीच नाही. यंत्रणा राजकीय दबावापुढे झुकली आहे. त्यातूनच सूत्रधार हे निर्दोष सुटले. निकालाची प्रत हाती मिळताच त्यावर विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवू.
- अविनाश पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती