...अखेर त्यांना मिळणार हक्काची घरे
By admin | Published: June 13, 2016 04:03 AM2016-06-13T04:03:41+5:302016-06-13T04:03:41+5:30
बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांचे हककाचे घर मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्वाला येणार आहे.
कल्याण : बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांचे हककाचे घर मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्वाला येणार आहे. या योजनेंतर्गत येथील कचोरे आणि इंदिरानगर येथे बांधलेल्या १ हजार ४१२ सदनिकांचे वाटप कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने मंगळवार १४ आणि बुधवार १५ जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना पैसे देण्याबाबतचे पत्र मिळाले आहे व ज्यांनी पैसे भरलेले आहेत. अशांना या सदनिका मिळणार आहेत. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिरात होईल.
कचोरे येथील १०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १ हजार ४१२ सदनिकांचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ज्या सदनिका तयार आहेत, त्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे.
संबंधित लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केडीएमसीने लाभार्थ्यांना पैसे देण्याबाबत दिलेली पावती आणि लाभार्थ्यांनी पैसे भरल्यानंतर दिलेली अशा दोन्ही पावत्यांची छायांकित प्रतही बंधनकारक करण्यात आली असून त्यानंतरच आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)