...अखेर माथेरानकरिता दोन मिनीबस सुरू

By admin | Published: October 19, 2016 03:29 AM2016-10-19T03:29:41+5:302016-10-19T03:29:41+5:30

कर्जत एसटी आगारातून माथेरानकरिता मिनीबस सुरू केली, त्या दिवसापासून ती चालू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला

Finally, the two mini-buses started for Matheran | ...अखेर माथेरानकरिता दोन मिनीबस सुरू

...अखेर माथेरानकरिता दोन मिनीबस सुरू

Next


कर्जत : कर्जत एसटी आगारातून माथेरानकरिता मिनीबस सुरू केली, त्या दिवसापासून ती चालू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. कधी टॅक्सी संघटनेचे आंदोलन तर कधी घाटावर न पोहचणाऱ्या कमी क्षमतेच्या मिनीबस यामुळे माथेरानकरांना नेहमीच त्रास होत होता.मिनीबस सुरळीत चालाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. परंतु आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले होते परंतु काही उपयोग होत नव्हता. मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर दोन मिनीबस माथेरानसाठी आल्या आणि त्यांच्या फेऱ्या सुद्धा झाल्या.
माथेरानसाठी राज्य परिवहन मंडळाने मिनीबस सुरु केली. त्यावेळी ती चालक व वाहक यांच्यासह जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात मिनीबस जळाली परंतु तरीही ती चालू ठेवण्यात यश आले. मिनीबस माथेरानच्या घाटात चढत नव्हती तरी चालकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ती चालू ठेवली. मात्र नंतर रस्ता खराब असल्याने व धोकादायक वळणे असल्याने अनेक वेळा अपघात झाले. नवीन मिनीबस उपलब्ध व्हाव्यात म्हणून विद्यार्थी व पालकांनी उपोषण केले. परंतु काही उपयोग झाला नाही. आमदार सुरेश लाड यांनी सुद्धा नवीन मिनीबससाठी प्रयत्न केले, प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला, त्यातच सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा प्रयत्न केले, तरीही मिनीबस उपलब्ध झाली नाही. अखेर १८ आॅक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर प्रशासन हलले आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दोन मिनीबस उपलब्ध करून दिल्या. त्यापैकी एका मिनीबसने माथेरान फेरी सुद्धा केली. आगार प्रमुख शंकर यादव, स्थानक प्रमुख डी. एस. देशमुख, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनंत पाटील, वाहतूक नियंत्रक व्ही. पी. बागुल, कर्जत आगार लाव्हारस ग्रुप प्रमुख शशांक धर्माधिकारी आदींनी या मिनीबसच्या फेरीचा शुभारंभ केला. चालक सुनील भासे व वाहक ज्योती इंगळे यांनी या मिनीबसची पहिली फेरी केली. (वार्ताहर)
>नवीन आलेल्या मिनीबस चांगल्या आहेत. परंतु त्या उंच असल्याने रस्त्याची झाडे लागतात, तसेच वळण घेताना दोन तीन ठिकाणी गाडी मागे पुढे करावी लागते. ही तांत्रिक अडचण दूर झाल्यास प्रवास सुकर होईल.
- सुनील भासे, चालक

Web Title: Finally, the two mini-buses started for Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.