अखेर विखेंची अमेरिका वारी रद्द
By admin | Published: July 3, 2015 03:33 AM2015-07-03T03:33:16+5:302015-07-03T03:33:16+5:30
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अमेरिकावारीवर जाणार होते. मात्र माध्यमांमधून आणि पक्षातूनही टीकेचे सूर उमटताच
मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अमेरिकावारीवर जाणार होते. मात्र माध्यमांमधून आणि पक्षातूनही टीकेचे सूर उमटताच त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या प्रेसनोटमध्ये विरोधी पक्ष नेतेदेखील या दौऱ्यात सहभागी होत आहेत असे नमूद केले होते. त्यावर विखे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
आपणास बृहन्महाराष्ट्र मंडळाचे निमंत्रण आले होते म्हणून आपण जाण्यास होकार दिला होता, असे विखे यांनी सांगितले होते. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी याविषयी आक्षेप घेतले, परिणामी विखे पाटील यांनी अमेरिका वारी रद्द करून टाकली आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळीदेखील चव्हाण यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांत विरोधी पक्षनेते कधीही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात परदेशवारीवर गेले नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री असताना कधीही विरोधी पक्ष नेत्यांना परदेशवारीवर नेलेले नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अशोक चव्हाण यांनी हात जोडत माईक विखे पाटील यांच्या दिशेने सरकवला होता. जर खाजगी पैशांनी आपण जात असाल तर आक्षेप असण्याचे कारण नाही, मात्र सरकारी पैशांनी आपण जात आहात, मुख्यमंत्र्यांनीदेखील आपल्या प्रेसनोटमध्ये तसे नमूद केले आहे त्यावर आपले म्हणणे काय, असा सवाल पत्रकारांनी केला होता.