अखेर याकूबचा फास आवळला
By admin | Published: July 30, 2015 05:16 AM2015-07-30T05:16:45+5:302015-07-30T06:20:43+5:30
मुंबईत मार्च १९९३ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून २५७ निरपराध नागरिकांचे बळी घेतल्याबद्दल याकूब अब्दुल रझाक मेमन याला अखेर उद्या ३० जुलै
नवी दिल्ली/ मुंबई : मुंबईत मार्च १९९३ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून २५७ निरपराध नागरिकांचे बळी घेतल्याबद्दल याकूब अब्दुल रझाक मेमन याला अखेर उद्या ३० जुलै या त्याच्या ५३ व्या वाढदिवशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून सकाळी दजेचा अर्ज फेटाळल्यानंतर रात्री १०.३०च्या सुमारास राष्ट्रपतींनीही याकूबचा दयेचा अर्ज फेटाळला. दयेचा अर्ज फेटाळल्यापासून प्रत्यक्ष फाशीपर्यंत किमान १४ दिवसांचा अवधी असायला हवा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही तरी आदेश घेण्याची याकूबच्या वकिलांची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह अनेक वकील सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन एक बैठक घेतली. यानंतर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात याकूबच्या दयेचा अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दयेचा अर्ज फेटाऴला आणि याकूबची शिक्षा टाळण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की सर्वाेच्च न्यायालयात रात्री उशिरा सुनावणी करण्यात आली.
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासाठी अजमल कसाबला नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात दिलेल्या फाशीनंतर सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेली ही दुसरी फाशी असेल. यासाठी कारागृह प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून याकूबच्या फाशीनंतर कोणताही अनुचित प्रकार घेडू नये यासाठी सर्व उपाय योजण्यात आले आहेत.
याकूबच्या फाशीची ३० जुलै ही तारीख चार महिन्यांपूर्वीच ठरली होती. मात्र त्यानुसार त्याला खरोखरच फाशी होईल की नाही याविषयीची अनिश्चितता प्रत्यक्ष फाशीच्या अगदी नऊ तास आधीपर्यंत कायम राहिली.
याकूबने ही फाशी टाळण्यासाठी कायदेशीर मार्गाने शक्य असलेले सर्व प्रयत्न अगदी शेवटपर्यंत केले. मात्र या सर्व प्रयत्नांत याकूब चारी मुंड्या चित झाला आणि मुंबई बॉम्बस्फोटांतील निरपराध बळींच्या कुटुंबियांना अखेर २२ वर्षांनंतर का होईना पण न्याय झाल्याचे समाधान मिळणार हे स्पष्ट झाले. (विशेष प्रतिनिधी)
मृतदेह देणार कुटुंबाच्या ताब्यात
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत फाशीनंतर याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अंत्ययात्रा काढायची नाही व ज्याचे स्मारक होईल अशा प्रकारे दफनविधी करायचा नाही, अशा अटी यासाठी घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाशीनंतरच्या औपचारिकता उरकल्यानंतर याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल आणि सकाळी ११ वाजताच्या विमानाने तो नागपूरहून मुंबईत आणण्यात येईल.
नियमानुसार
फाशीच्या वेळी याकूबचे पुरुष कुटुंबिय हजर राहू शकतील. त्याचा चुलत भाऊ उस्मान व मोठा भाऊ सुलमान हे नागपूरमध्येच तळ ठोकून आहेत.
फाशी टाळण्यासाठी सुरु होती दिवसभर धडपड
याकूबच्या फाशीच्या संदर्भात बुधवारी दिल्ली व मुंबईत वेगाने घटना घडल्या. ‘डेथ वॉरन्ट’विरुद्ध याकूबने केलेली याचिका सुमारे पाच तासांच्या उत्कंठावर्धक सुनावणीनंतर दुपारी चारच्या सुमारास फेटाळली. त्यानंतर काही मिनिटांतच याकूबने केलेला दयेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळल्याचे जाहीर झाले. तरीही चित्र स्पष्ट नव्हते.
सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच याकूबने राष्ट्रपतींकडेही दयेचा अर्ज केला होता. तो फेटाळण्याची शिफारस गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना केली. त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत सुमारे दोन तास बैठक झाली. ही बैठक सुरु असतानाच याकूबच्या वकिलांनी अत्यंत जलद गतीने धावपळ करून दयेचा अर्ज फेटाळण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
ही याचिका लगेच सुनावणीस घ्यावी व राष्ट्रपतींनाही दयेच्या अर्जावर रात्री निर्णय न घेण्यास सांगावे, अशी काहीशी न भूतो अशी विनंती सरन्यायाधीशांना त्यांचया घरी जाऊन करण्याची वकिलांची तयारी सुरु असतानाच रात्री १०.३०च्या सुमारास राष्ट्रपतींनी याकूबचा दयेचा अर्ज फेटाळला. तरीही दयेचा अर्ज फेटाळल्यापासून प्रत्यक्ष फाशीपर्यंत किमान १४ दिवसांचा अवधी असायला हवा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही तरी आदेश घेण्याची याकूबच्या वकिलांची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
परंतु राष्ट्रपतींनी एकदा नव्हे तर दोनदा दयेचा अर्द फेटाळल्यानंतर न्यायालय या फाशीमध्ये ऐनवेळी कितपत आणि कसा हस्तक्षेप करू शकेल,याविषयीचे चित्र हे वृत्त देईपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.त्यामुळे याकूब फासावर लटकणार की नाही याविषयीची अनिश्चितता संपली. त्याआधी सायंकाळी याकूबची वैद्यकीय तपासणी केली व तो फाशी देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यात आली.
दुपारी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सद्य परिस्थिती व योजलेले उपाय यांचा समग्र आढावा घेतला. तिकडे तुरुंग प्रशासनाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी नागपूर येथे याकूबच्या फाशीच्या तयारीची पाहणी केली.
दफनविधी मुंबई की नागपुरात? : याकूबच्या फाशीनंतर त्याचा दफनविधी मुंबईत होणार की नागपुरात याबाबत अनिश्चितता असली तरी पर्यायी व्यवस्था म्हणून तुरुंगाच्या आवारातच दफनविधीची तयारी करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईत २५ हजार पोलीस तैनात
याकूबला फाशी दिल्यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईत बुधवारी मध्यरात्रीपासूनच तब्बल २५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. खबरदारी म्हणून २०० संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात असतील, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयातून मिळाली.