‘फायनान्स’ने यंदाचा उन्हाळा सुसह्य!
By admin | Published: March 5, 2015 12:01 AM2015-03-05T00:01:37+5:302015-03-05T00:01:37+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे.
विजयकुमार सैतवाल ल्ल जळगाव
उन्हाळ्याची चाहूल लागताच कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. यंदा तर विविध कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य योजना देऊ केल्याने कूलरपेक्षा ए.सी.ला अधिक पसंती असल्याचे बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे ‘फायनान्स’ने यंदाचा उन्हाळा सुसह्य होणार असल्याचे चित्र आहे.
आग ओकणारा सूर्य व अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी कूलर, ए.सी., फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून उन्हाच्या दाहकतेपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांचे कूलर अथवा डेझर्ट (बाहेर खिडकीत बसविण्याचे)ला अधिक पसंती दिसून येते. यंदा मात्र उलट चित्र आहे.
वाढती स्पर्धा व नवनवीन तंत्रज्ञान यामुळे या कंपन्या वेगवेगळ्या योजना राबवितात. अशाच प्रकारे यंदा जवळजवळ सर्वच कंपन्या कोणतीही रक्कम (डाऊन पेमेंट) न भरता शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य (फायनान्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. ए.सी.वरसुद्धा अर्थसाह्य मिळत असल्याने ग्राहकांचा कल यंदा ए.सी.कडे दिसून येत आहे.
शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य तर आहेच, शिवाय ए.सी.ला वारंवार पाणी टाकणे, विजेच्या धक्क्याची भीती नाही, जागेचा प्रश्न व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदा वातावरण थंड (कूलिंग) झाले की, ए.सी. आपोआप बंद होतो. या सर्व कारणांमुळेही ए.सी.ला पसंती वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पाऊण टन ते १६ टनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ए.सी. बाजारात उपलब्ध असून गरजेनुसार त्यांना मागणी आहे. उन्हाळ्यात कोणतीही वस्तू घेतली तरी विजेच्या भारनियमनामुळे काही उपयोग होत नाही म्हणून अनेक कंपन्यांनी इन्व्हर्टरवर चालणारा ए.सी.सुद्धा बाजारात आणल्याने ए.सी.कडे कल वाढत आहे.
पंखे पडले मागे
४उन्हाळ्यामध्ये साधारणत: पंख्यांना मागणी असायची. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात पंखे परिणामकारक ठरत नसल्याने कूलर, ए.सी. यांना जास्त मागणी आहे. त्यामुळे पंख्यांची मागणी घटली आहे.
४कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये यंदा चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. याला कारण सांगितले जात आहे ते म्हणजे या वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम.
कोणतेही डाऊन पेमेंट नाही व शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य उपलब्ध असल्याने सध्या ग्राहकांचा कूलरपेक्षा ए.सी.कडे अधिक कल आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इतरही वस्तूंना मागणी वाढली आहे.
-दिनेश पाटील, विक्रेते, जळगाव
भारनियमनाच्या वाढत्या समस्येमुळे इन्व्हर्टरवर चालणारे ए.सी. बाजारात आले आहेत. शिवाय ए.सी.ला पाणी टाकणे व विजेच्या धक्क्याची भीती नाही. या सुविधेसह फायनान्समुळे ए.सी.ची मागणी जास्त आहे.
-महेंद्र ललवाणी, विक्रेते, जळगाव