अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 04:04 PM2019-06-18T16:04:07+5:302019-06-18T17:05:36+5:30
सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
मुंबई - विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारअर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार करून ग्राफीक्ससह प्रसिद्ध झाल्याने विधानपरिषदेत गोंधळ उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटला असून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवारअर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनतर, अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी अर्थसंकल्प वाचनावेळी प्रचंड गोंधळ घातला. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटलाय. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री @SMungantiwar यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटलाय. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी. @CMOMaharashtra#MonsoonSessionpic.twitter.com/VYj61Q9hz5
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 18, 2019
सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे. राज्याचा अर्थसंकल्प फुटला आहे. हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली. मुनगंटीवार जेव्हा अर्थसंकल्प वाचत होते त्यावेळी ते ट्विट करताना दिसले नाहीत. मग त्यांच्या नावाने कोण ट्विट करत होते. याचा अर्थ असा होते की, अर्थसंकल्प फुटला आहे. असेही पवार म्हणाले.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत अर्थसंकल्प मांडताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तो थांबवण्यात आल्याचा आरोप केला. अर्थसंकल्प मांडत असताना पहिल्यांदाच त्यांना थांबवून प्रश्न विचारण्यात आला. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही दिला.