वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2015 02:16 AM2015-07-10T02:16:37+5:302015-07-10T02:16:37+5:30
राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर
मुंबई : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ४०२.७३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे (उदा. बँक खाते उपलब्ध नसणे) मदतीचे वाटप होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.
२०१४मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते. ५० पैशांपैक्षा कमी पैसेवारी आलेल्या बाधित शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काही निधी तांत्रिक कारणामुळे गेल्या आर्थिक वर्षात वितरित होऊ शकला नव्हता.
आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक विभागास २.५५ कोटी रुपये, औरंगाबाद विभागास ३५२.२४ कोटी रुपये तर अमरावती विभागास ४७.९४ कोटी रुपये अशी एकूण ४०२.७३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.