दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:51 AM2018-10-10T11:51:06+5:302018-10-10T11:51:24+5:30

यशकथा :  गायींपासून दररोज ९५ ते १०० लिटर दूध मिळते़ या दुधाला सरासरी २३ रुपये भाव मिळत असून खर्च वजा जाता महिन्याकाठी ५० हजार रुपये मिळतात.

Financial incentives from dairy business | दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

googlenewsNext

- सुरेश चव्हाण (कन्नड, जि. औरंगाबाद)

उच्चशिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने हताश न होता स्वत:चा व्यवसाय करून सुखी जीवन जगता येते हे दाखवून दिले आहे तालुक्यातील चिकलठाण येथील तरुण शेतकऱ्याने़ सुधीर पोपटराव चव्हाण असे या युवकाचे नाव असून, त्याने एमक़ॉम़ डिग्री मिळविलेली आहे़ नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्याने दुग्ध व्यवसाय करायचा ठरविले़ त्यासाठी या व्यवसायाचा वर्षभर अभ्यास केला़ त्यानंतर त्याने शेतात ७८ बायचा मुक्त गोठा उभारला़ यासाठी त्याला दीड लाख रुपये खर्च आला़ गोठ्यात गायींना पिण्यासाठी पाण्याचा हौद बांधला़ ५० हजार रुपयाला एक याप्रमाणे सात संकरीत गायी आणल्या़ या गायींपासून दररोज ९५ ते १०० लिटर दूध मिळते़ या दुधाला सरासरी २३ रुपये भाव मिळत असून खर्च वजा जाता महिन्याकाठी ५० हजार रुपये मिळतात, असे त्याने सांगितले़

कोणताही व्यवसाय करताना आपण फक्त मिळणारा पैसा पाहतो़ मात्र, व्यवसायात करावे लागणारे कष्ट पाहत नाहीत़ सुधीर दररोज सकाळी ६ वाजता उठतो़ रात्री मोकळ्या असलेल्या गायी खुंट्याला बांधून प्रत्येक गायीसमोर गव्हाणीत १५ कि़ मुरघास टाकतो़ त्यानंतर ७ गायींसाठी ६ कि़ ढेप, ६ कि़ सुग्रास व गहू-मका यांचा ४ कि़ भरडा एकत्र करून भिजू घातला जातो़ यंत्राच्या साहाय्याने दूध काढतो़ त्यानंतर ढेप, सुग्रास व भरडा हे भिजलेले मिश्रण गायींना देऊन गायी मोकळ्या सोडून आठ वाजता दूध डेअरीवर घेऊन जातो़ त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता गोठ्यात प्रवेश करून अगोदर शेण उचलून प्रतिगाय १५ कि़ प्रमाणे मुरघास टाकून सकाळप्रमाणेच ढेप, सुग्रास व भरडा मिश्रण भिजण्यास टाकतो. दूध काढल्यानंतर खाद्य मिश्रण देऊन पावणेआठ वाजता दूध डेअरीत घेऊन जातो़

हुरड्यातील मक्याची कुट्टी करून दोन कि़ मीठ, दोन कि़ गूळ, एक कि़ युरिया व एक कि़ दही यांचे द्रावण करून २० लिटर पाण्यात मिसळून ४५ कि़ कुट्टीवर एक लि़ द्रावण शिंपडून खड्डा किंवा भोद यामध्ये साठवून ठेवतो़ ४५ दिवसांनंतर मुरघास जनावरांसाठी तयार होतो़ चिकलठाण येथे दोन दूध संकलन केंद्र असून यंत्राद्वारे दुधाचा फॅट, डिग्री तपासून दूध उत्पादकांना दुधाला मिळालेला भाव लगेच कळविला जातो़ 

शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत सुधीर चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. त्यांचे म्हणणे असे की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतात नवीन उपक्रम राबविल्यास शेती फायद्याची आहे. केवळ नशिबाला दोष देत शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे प्रकार करू नयेत. आत्महत्या हा काही पर्याय नाही. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेती करावी, शेतीत खूप मेहनत करावी. शेतीला जोडधंदा म्हणून दुधासारखे व्यवसाय केल्यास चार पैसे खिशात राहतील आणि शेतीही फायद्याची राहील, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Financial incentives from dairy business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.