वित्तीय संस्थेस आठ लाखांचा गंडा

By admin | Published: July 14, 2017 01:36 AM2017-07-14T01:36:32+5:302017-07-14T01:36:32+5:30

८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन वित्तीय संस्थेस गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ ठगांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली

The financial institution owes eight lakhs | वित्तीय संस्थेस आठ लाखांचा गंडा

वित्तीय संस्थेस आठ लाखांचा गंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : जुन्या इनोव्हा कारची खरेदी करावयाची असे भासवून त्या गाडीची परिवहन विभागाची बनावट कागदपत्रे तयार करून, एका खासगी वित्तीय संस्थेकडून त्याआधारे ८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन वित्तीय संस्थेस गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ ठगांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या फसवणूक प्रकरणी उरुळी कांचन (ता. हवेली) आश्रमरोड येथील श्रीराम फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र जयशंकर तिवारी (वय ४१, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण भगवान भोंडवे (रा. मांजरी बुद्रुक), प्रकाश दत्तात्रय ससाणे (रा. हडपसर, पुणे २८), स्वप्निल रामदास चौघुले (रा. सासवड, ता. पुरंदर), रवींद्र गायकवाड व दत्तात्रय पवार (रा. बारामती) या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : सदर प्रकार १ मे २०१६ ते १२ जुलै २०१७ या कालावधीत घडला आहे. इनोव्हा कार (एमएच १२ यूडब्यू) ही जुनी गाडी खरेदी करण्यासाठी किरण भोंडवे याने श्रीराम फायनान्स कंपनी शाखा उरुळी कांचन या खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेकडे ८ लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी लागणारी परिवहन विभागाची सर्टिफिकेट, वाहन चालवण्याची सशुल्क पावती, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सर्टिफिकेट आदी आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पूर्तता त्याने केली होती. त्याचबरोबर दोन जामीनदार यांची कागदपत्रेही दिली होती. सर्व कागदपत्रे पाहून सदर वित्तीय संस्थेने भोंडवे यास ८ लाख रुपयांचे कर्ज ७ हप्त्यांच्या परतफेडीच्या बोलीवर दिले.
कर्जाचे काही हप्ते भरले. परंतु, नंतर मात्र पैसे भरण्यास टाळाटाळ होऊ लागली. वित्तीय संस्थेने नियमानुसार कर्ज फेडावे म्हणून कर्जदारासह जामिनदारांना स्मरणपत्रेही पाठवली. तरीही कर्जाच्या रकमेची परतफेड होत नाही हे पाहून संस्थेने वरील सहा जणांविरोधात अर्ज दाखल केला.
सदर प्रकरणाच्या चौकशीत परिवहन विभागाची कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगवले हे करत आहेत.

Web Title: The financial institution owes eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.