सातारच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:51 PM2018-12-10T13:51:25+5:302018-12-10T13:51:50+5:30

यशकथा :  सर्कलवाडीच्या मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धीचा आदर्श निर्माण केला आहे. 

The financial prosperity of the Satara farmer brought out by strawberries | सातारच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी

सातारच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी

googlenewsNext

- संतोष धुमाळ (सातारा) 

स्ट्रॉबेरी म्हटले की प्रथमत: महाबळेश्वर व पाचगणीचे नाव घेतले जायचे. तर पूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे; पण अ   लीकडे या पिकाचे उत्पादन इतर ठिकाणीही होऊ लागले असून, त्यातून भरघोस उत्पादन मिळत आहे. अशाच प्रकारे कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडीच्या मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धीचा आदर्श निर्माण केला आहे. 

सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडी येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र्र सरकाळे यांनी राबविलेल्या प्रयोगातून येथे स्ट्रॉबेरी उत्पादनाची चळवळ सुरू झाली. त्यांचे  अनुकरण करीत सर्कलवाडीचे युवा शेतकरी मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरी रोपे व फळाच्या उत्पादनातून भरघोस आर्थिक समृद्धी साधली आहे. मंगेश सरकाळे हे गेल्या ८ ते ९ वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून त्यांनी आपल्या कुटुंबाची व्यवस्थित आर्थिक घडी बसविली आहे. यावर्षी त्यांनी केलेल्या लागवडीतून किमान पंधरा लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. चांगले उत्पादन मिळण्याची खात्री झाल्याने सरकाळे दरवर्षी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी पिकाचे नियोजन करतात. 

स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी प्रथमत: जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करतात. यासाठी एकरी साधारणत: ८ ते १० टन शेणखत वापरले जाते. त्यानंतर जमिनीवर गादीवाफे तयार करतात. १ एकर मदरप्लॉटच्या लागवडीसाठी साधारणत: ३ ते ४ हजार रोपांची आवश्यकता असते. एका रोपासाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीच्या फळ उत्पादनापेक्षा रोपे उत्पादनावर भर दिला. त्यातून लाखोंची उलाढाल करून अपेक्षित यश मिळविले आहे.
एक एकर प्लॉटमधून शाखीय विस्तार वाढ पद्धतीतून साधारणत: अडीच ते तीन लाख रोपे तयार केली जातात. पाण्याच्या बचतीसह तणाच्या बंदोबस्तासाठी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.  लागवडीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीत फळधारणेस सुरुवात होते. फळाच्या परिपक्वतेच्या कालावधीत प्रत्येक दिवशी पहाटे फळांची तोडणी करून प्रतवारीनुसार बॉक्समध्ये पॅकिंग करून माल गोवा व इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो.

बदलत्या हवामानामुळे दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी पिकावर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून सरकाळे हे रासायनिक तसेच जैविक व सेंद्रिय खताचादेखील वापर करीत आहेत.  भांडवली खर्च विचारात घेता एक एकर मदर प्लॉटमधून साधारणत: ७ ते १० लाख रुपये व फळ उत्पादन प्लॉटमधून ४ ते ५ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. असे असले तरी दरानुसार त्यात फरक होत आहे. विविध  कारणांमुळे स्ट्रॉबेरीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. तरीही योग्य नियोजन केल्यास उत्पादनात यश मिळतेच अशी माहिती शेतकरी मंगेश सरकाळे यांनी दिली. 

Web Title: The financial prosperity of the Satara farmer brought out by strawberries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.