दाम्पत्यांना आर्थिक पाठबळ
By admin | Published: April 18, 2016 01:32 AM2016-04-18T01:32:21+5:302016-04-18T01:32:21+5:30
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक क्रांती झाली आहे. अशा सोहळ्यात विवाह करणाऱ्या एससी व एसटी प्रवर्गातील जोडप्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तर खुल्या
जालना : सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक क्रांती झाली आहे. अशा सोहळ्यात विवाह करणाऱ्या एससी व एसटी प्रवर्गातील जोडप्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तर खुल्या वर्गातील जोडप्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत सरकार करणार आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. हा निर्णयाची अंमलबजावणी १६ एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावाने होईल.
जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारलेल्या बळीराजानगरमध्ये शिवस्मारक समिती व प्रदेश भाजपाच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध व अपंग अशा ५५१ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
व्यासपीठावर सोहळ्याचे संयोजक व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. नरेंद्र पवार, महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री बबनराव लोणीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा गेल्या तीन वर्षांपासून होरपळला असून पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही. या पार्श्वभूमीवर जिथे-जिथे जे-जे शक्य आहे, ते-ते राज्य सरकारच्यावतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पिण्याच्या पाण्यालाच सरकारचे प्राधान्य असून कुठल्या उद्योगाचे पाणी बंद करावे, याबाबतच्या निर्णयाचे अधिकार हे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. परिस्थितीनुरुप हे अधिकारी निर्णय घेतील.
लातूर येथील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, पंतप्रधानांनी लातूरच्या पाणीटंचाईची दखल घेतली, तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष रेल्वेची व्यवस्था करून दिली. तेथील लोकांना वाटले की, रेल्वेने मेपर्यंत पाणी येईल. पण केवळ १५ दिवसांतच रेल्वेने पाणी आणण्यात आले. दुसरीकडे निम्न तेरणा प्रकल्प योजना कार्यान्वित करण्यात आली. या प्रकल्पातून ५० लाख लिटर पाणी देण्यात आले तर रेल्वेद्वारे आतापर्यंत ५० लाख लिटर असे १ कोटी लिटर पाणी लातुरकरांसाठी पुरविण्यात आलेले आहे. पूर्वी दरवर्षी मार्च महिन्यात चारा छावण्या सुरु केल्या जात असत. पण सरकारने गतवर्षी जुलैमध्येच चारा छावणी सुरु केली आहे. आगामी काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातून चारा आणून सरकारच्यावतीने लातूर जिल्ह्यात चारा छावण्या उभारण्यात येतील, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.
रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळग्रस्तांच्या मुलींचे लग्न लावून देण्याचा संकल्प आपण केला होता. १ हजार जोडपी सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या तीन दिवसांत ७५० जोडप्यांची नोंदणी झाली. परंतु कपडे व इतर वस्तू शक्य नसल्याने ५५१ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला आहे.
कर्ज काढू, पण शेतकरी वाचवू!
बीड : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. या दुष्काळात राज्य व केंद्र सरकारने संवेदनशीलपणे उपाययोजना केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली तरी मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
पालवण (ता. बीड) येथील गुरांच्या चारा छावणीत यशवंत सेवाभावी संस्था व लोकविकास मंच आयोजित शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. सोलापूर व पुणे जिल्ह्यातून चारा उपलब्ध करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्यातबंदी उठविण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. दुष्काळात सामूहिक विवाह सोहळ्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर ४० जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी हजारो वऱ्हाडी उपस्थिती होती.
प्रत्येकी २० हजारांची मदत
हिंगोली येथील ब्रिजलाल खुराणा या भाजपा कार्यकर्त्याने रविवारी जालन्यात झालेल्या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याला २० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
ही मदत काही दिवसांतच मुंबई येथील प्रदेश भाजपा कार्यालयात देण्यात येणार असल्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येणार आहेत.