नवीन दत्तक प्रक्रियेला पर्याय शोधा - हायकोर्ट
By admin | Published: January 10, 2016 01:27 AM2016-01-10T01:27:58+5:302016-01-10T01:27:58+5:30
सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स एजन्सीने (कारा) मूल दत्तक घेण्यासाठी आखलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत मुले दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि एनजीओ यामध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याने
मुंबई : सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स एजन्सीने (कारा) मूल दत्तक घेण्यासाठी आखलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत मुले दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि एनजीओ यामध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याने या मार्गदर्शक तत्त्वांना पर्यायी मागदर्शक तत्त्वे आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने काराला केली आहे.
‘नव्या मार्गदर्शक तत्त्वांची कार्यक्षमता पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाने मुले दत्तक घेण्यासाठी काराच्या आॅनलाइन पद्धतीविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले. मुले दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांच्या तक्रारी बघा आणि याबाबत आम्हाला कळवा, असे खंडपीठाने काराला सांगितले. सध्याच्या दत्तक प्रक्रियेविरुद्ध पालक आणिएनजीओंकडून तक्रारी आल्याची माहिती या प्रकरणी खंडपीठाने ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नेमेलेले ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी खंडपीठाला दिली. ‘या तांत्रिक बाबीतून बाहेर पडून विचार करा,’ असे म्हणत खंडपीठाने काराला ३ फेब्रुवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)