पाण्याची तीव्र अडचण भासणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा, जयंत पाटलांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:42 PM2021-07-20T17:42:30+5:302021-07-20T17:45:10+5:30
Jayant Patil : सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली.
मुंबई : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश जयंत पाटील यांनी दिले.
या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नवीन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. #shivsena#mumbaiairporthttps://t.co/Xw0KRLVKye
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2021
पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच, सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.