‘शेतकरी आत्महत्येची कारणे शोधा’, गृह विभागाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 02:02 AM2017-09-17T02:02:46+5:302017-09-17T02:02:54+5:30
राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.
- विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.
शेतकरी आत्महत्येबाबतचे अहवाल लवकर दिले जात नाही आणि त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या कुटुंबास सरकारी आर्थिक मदत देण्यात दिरंगाई होते, याकडे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत लक्ष वेधले होते.
हा विलंब टाळण्यासाठी गृह विभागाने शनिवारी जारी केलेल्या आदेशात, पोलिसांनी शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधावे, असे सांगण्यात आले आहे.
अशा आत्महत्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करावा. संबंधित पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाच्या तपासाबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि योग्य ती दक्षता घ्यावी.
अशा प्रकरणाबाबतची कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याची दक्षता सर्व जिल्हा
पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांनी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.