माझ्या काळजाच्या तुकड्याला शोधा!

By admin | Published: May 28, 2017 01:20 AM2017-05-28T01:20:01+5:302017-05-28T01:20:01+5:30

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ गणपत भिल्ल हे बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

Find a Piece of My Feelings! | माझ्या काळजाच्या तुकड्याला शोधा!

माझ्या काळजाच्या तुकड्याला शोधा!

Next

- मतीन शेख/ विनायक वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ गणपत भिल्ल हे बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. माझ्या मुलाने शौर्य दाखवून बुडत असलेल्या मुलाला वाचविले आता माझ्या काळजाच्या तुकड्यांना शोधून आणण्याचे शौर्य कोणी दाखवेल काय?, अशी आर्त हाक नीलेशची आई सुंदराबाई यांनी दिली आहे. कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील गावकुसाबाहेर आशापुरी देवी मंदिरामागे रेवाराम भिल्ल व त्यांचा परिवार वास्तव्यास आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब नीलेशमुळे प्रकाशझोतात आले.
कोथळी येथे मुक्ताई मंदिरानजीकच्या जलाशयात बुडत असताना भागवत ओंकार उगले (रा. बुलडाणा) यास ३० आॅगस्ट २०१५ रोजी नीलेशने वाचविले होते. नीलेशच्या अतुलनीय शौर्याबद्दल २६ जानेवारी २०१६ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देवून त्याला गौरविले. त्यानंतर सेल्फी वुइथ नीलेशपासून नीलेशसोबत फोटो काढून अनेकांनी त्याच्या सत्काराचे भांडवल करून घेतले. पुढारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी अगदी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी चारचाकी गाड्यांमधून धुळ उडवीत गावकुसाबाहेरील त्याच्या घरापर्यंत गेले. नीलेशचे कुडाचे घर पाहून त्याला मदत करण्याची भाषाही अनेकांनी केली. त्याच्या कुटुंबीयांच्या जीवनात कोणताही फरक पडला नाही. पुत्राच्या शौर्याने आकाश ठेंगणे झालेले त्याचे कुटुंब आज व्याकुळ होऊन नीलेश व गणपतंच्या घरी परतण्याची वाट पाहत आहेत.

बकऱ्या चरायला न नेल्याने भीतीतून घर सोडले
बकऱ्या चरण्यासाठी न नेल्याने वडील रागावतील म्हणून भीतीपोटी नीलेशने १६ मे रोजी घर सोडले. दोन दिवसांनी तो घरी आला व गिट्टी मशीन लगतच्या शेडमध्ये झोपला.
आई-बाबा बाहेर गेल्याचे पाहून गुरुवारी तो सकाळी ९.३० ला निघाला. भाऊ जात असल्याचे पाहून गणपत त्याच्या मागे लागला. मग नीलेश त्यालाही घेऊन बाहेर पडला.

पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी
मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला
आहे. प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली आहे. अगदी २१ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती घेण्यात आली. एकलव्य सेनाही त्याच्या शोध मोहिमेत लागली आहे.

कुडाचे घर
नीलेशचे घर म्हणजे १२ पत्रांचे फक्त छप्पर आहे. भिंतीच्या आडोशाला एका पत्र्याच्या पेटीत नीलेशचा सन्मान केलेला साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. नीलेशच्या बातम्या टीव्हीवर येतात म्हणून महिन्याभरापूर्वी हप्त्याने घेतलेला आठ हजार रुपये किमतीचा टीव्ही जसाचा तसा खोक्यात पडून होता.सत्कारात मिळालेली सायकल नादुरुस्त आहे. पैसे नसल्याने ती छपरावर ठेवण्यात आली आहे.

आई-वडिलांची पायपीट
दोन मुलांच्या विरहातील
रेवराम व सुंदराबाई भिल यांची गावोगावी मुलांच्या शोधासाठी पायपीट सुरू आहे. पहाटेपासून दोघे जण पाणावलेल्या
डोळ््यांनी भेटेल त्याला पोरं दिसली का?, विचारतात. अंधार पडला घरी परतात. उघड्या घरातून शौर्यपदक चोरीला जाऊ नये, म्हणून त्याची आई ते स्वत:
जवळच ठेवते.

चूल पेटली नाही : प्रस्तुत प्रतिनिधी त्याच्या घरी गेले तेव्हा नीलेशची आई भांडी घासत होती. परंतु ते भांडे सात दिवसांपूर्वी स्वयंपाक केलेले होते. त्यांच्या घरात आठ दिवसांपासून चूल पेटलेली नव्हती.

Web Title: Find a Piece of My Feelings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.