पुतळा हटविण्यामागचा बोलविता धनी शोधू
By Admin | Published: January 5, 2017 03:33 AM2017-01-05T03:33:33+5:302017-01-05T03:33:33+5:30
समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. यामध्ये सहभागी असणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे
पुणे : समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. यामध्ये सहभागी असणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र त्याचबरोबर या साऱ्या प्रकारामागचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक सुनीता गलांडे, योगेश मुळीक उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून आम्हाला सातत्याने प्रेरणा मिळते. मात्र काही जण छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांचे नाव वापरून संकुचित काम करीत आहेत. त्यांना एका जातीत, धर्मात बांधून ठेवण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे. त्यातून गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. या पुतळा हटविणाऱ्यांना शिवाजी व संभाजी महाराज समजलेलेच नाहीत.’’