ओळख शोधते मी...अंधारात राहुनी चांदणे शोधते...

By admin | Published: August 2, 2016 03:55 AM2016-08-02T03:55:37+5:302016-08-02T03:55:37+5:30

‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते,

Finding the identity I ... Rahuni finds the moonlight in the dark ... | ओळख शोधते मी...अंधारात राहुनी चांदणे शोधते...

ओळख शोधते मी...अंधारात राहुनी चांदणे शोधते...

Next


ठाणे : ‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते, अंधारात राहुनी चांदणे शोधते’ या कविता कोणा प्रसिद्ध कवीच्या नाहीत किंवा कोणत्या कवीसंमेलनात सादर झालेल्या नाहीत; तर त्या आहेत मनोरुग्णांच्या लेखणीतून उतरलेल्या. प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन महिला मनोरुग्णांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी कोणी जवळची व्यक्ती नाही, ना कोणी बोलायला. त्यामुळे आपले सुख-दु:ख, वेदना, आपुलकी, एकाकीपण सारं सारं काही त्या कवितांतून व्यक्त करीत आहेत.
यातील एक महिला नालासोपाऱ्याची, तर एक ठाण्याची आहे. एकीला संतापाने मानसिक आजार झाला; तर दुसरीला आई-वडिलांत वारंवार होणाऱ्या कलहामुळे. दोघींनी मात्र आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला आणि त्यांच्या छानशा कविता त्यांच्या शब्दांतून फुलून आल्या.
मनोरुग्णालयात असतानाही त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत आणि त्यांचे कविमन जपण्याचे काम प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचारतज्ज्ञ करीत आहेत.
नालासोपाऱ्याला राहणारी महिला एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईने धुणी-भांड्याची कामे करण्यास सुरूवात केली. ती आजी आणि मावशीसोबत गावी राहत होती. शिक्षणही तिथेच घेतले. सातवीला असल्यापासून तिच्यात कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. ती शिक्षकांमुळे निर्माण झाल्याचे ती सांगते. मात्र वयाच्या १८ व्या वर्षी तिच्यातील आजाराला सुरूवात झाली आणि त्यावेळी कोणी लक्ष न दिल्याने तो वाढत गेला. सुरूवातीला कानात आवाज ऐकू यायचे. मग चिडचिड व्हायची. खूप संताप यायचा. लग्नानंतर हा त्रास वाढत गेला. जेव्हा मी शांत असे, तेव्हा मात्र कविता लिहीत बसे, असे ती सांगते. दीड वर्षांपूर्वी ती उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल झाली. सहा महिन्यांत ती दोनदा दाखल झाल्याचे तेथील व्यवसायउपचार तज्ज्ञांनी सांगितले. तिला निसर्ग, व्यक्तिमत्त्व, सण आदी विषयांवर कविता लिहायला आवडतात. जवळपास १०० कविता लिहील्याचे ती सांगते. श्रावण, वटपौर्णिमा, बहरलेला निसर्ग, सुख-दु:खाची व्याख्या, इंद्रधनुष्य अशा विविध विषयांवर कविता लिहिल्या आहेत. तिला त्याचे पुस्तक काढण्याची फार इच्छा आहे.
ठाण्यातील महिला रुग्णाने सांगितले, माझे बालपण चांगल्या वातावरणात झाले नाही. वडिलही लक्ष देत नव्हते. आठवीत असताना आई गेली. त्यामुळे मला एकाकी वाटायचे. मग मी लिहू लागले आणि त्यातून कवीमनाचा जन्म झाला. सुरूवातीला प्रेरणा देणारी ‘जीवन हे सुंदर जगता आले पाहिजे,’ ही कविता लिहिली आणि त्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी लिहित गेले. कलेची मला पहिल्यापासून आवड आहे, असे ती सांगते. ‘आसवांची रात्र’, ‘बंधन’, ‘लाचार’ यासारख्या जवळपास २५ कविता तिने शब्दबद्ध केल्या आहेत. इथे आल्यावर तीन - चार कविता लिहिल्याचे ती सांगते. (प्रतिनिधी)
>कलागुण फुलविणे हा हेतू
व्यवसाय उपचार केंद्रात रुग्णाच्या क्षमतेचा उपयोग विविध अॅिक्टव्हिटीसाठी केला जातो. त्यातून ते व्यक्त होतात. त्याच्यातील कलागुण फुलतात. या दोघींनी आम्हाला कविता सुचतात, असे सांगितले. मग त्यांना वही दिली आणि त्यातून त्यांनी कविता लिहिण्यास सुरूवात केली.
- रुपा किणकर, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, प्रादेशिक मनोरुग्णालय

Web Title: Finding the identity I ... Rahuni finds the moonlight in the dark ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.