एसीबीकडून एमईटीत झडती
By admin | Published: June 18, 2015 02:37 AM2015-06-18T02:37:53+5:302015-06-18T02:37:53+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज छगन भुजबळ यांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये धाड घालून शोधाशोध केली.
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज छगन भुजबळ यांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये धाड घालून शोधाशोध केली. ही शोधमोहीम काही तास चालली. महाराष्ट्र सदनासह कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्याशी संबंधित व्यवहाराची कागदपत्रांचा शोध एसीबीकडून घेतला जात आहे.
दोन दिवसांपासून एसीबीने राज्यात सर्वत्र भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर छापासत्र आरंभले आहे. या सर्व मालमत्तांची किंमत काढल्यानंतर या मालमत्ता भुजबळ यांनी घोटाळ्यातून उभ्या केल्या आहेत का, याचा तपास एसीबी करणार आहे. त्यासाठी एसीबीकडून भुजबळ, पंकज, समीर यांना पुन्हा एकदा नव्याने चौकशीला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या टप्प्यावर भुजबळ यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा गुन्हा नोंदविण्याचा एसीबीचा विचार नाही. तूर्तास जे गुन्हे दाखल आहेत, त्याचाच तपास सुरू आहे.
भुजबळ कुटुंबीयांची नाशिक जिल्ह्यातील विविध निवासस्थाने आणि कार्यालयांवर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकल्यानंतर बुधवारी आणखी दोन ठिकाणी छापे टाकले़ मंगळवारच्या छाप्यात तपासी अधिकाऱ्यांना चंद्राई बंगल्यामध्ये २३ हजार ५०० रुपयांची रोकड मिळाली आहे. (प्रतिनिधी)