बेपत्ता तरुणास शोधले ‘फेसबुक’वर!

By admin | Published: February 4, 2015 03:06 AM2015-02-04T03:06:47+5:302015-02-04T03:06:47+5:30

गेल्या सात वर्षांपासून या तरुणाचा नातेवाईक, मित्र अशा सर्वच माध्यमातून शोध सुरू असताना पोलिसांनाही त्यांच्या तपासात ‘फेसबुक’चा आधार लाभला.

Finding missing youth on Facebook! | बेपत्ता तरुणास शोधले ‘फेसबुक’वर!

बेपत्ता तरुणास शोधले ‘फेसबुक’वर!

Next

पोलिसांनी घेतला ‘सोशल मीडिया’चा आधार : सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला
शिरपूर (जि. धुळे) : सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरले आहे. मुख्य म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून या तरुणाचा नातेवाईक, मित्र अशा सर्वच माध्यमातून शोध सुरू असताना पोलिसांनाही त्यांच्या तपासात ‘फेसबुक’चा आधार लाभला.
बोराडीच्या फार्मसी महाविद्यालयातून बेपत्ता झालेला हेमंत चरणदास लांजेवार नागपूरमधील एका हॉटेलात कूक (स्वयंपाक करण्याचे) म्हणून काम करीत होता. तपास अधिकारी विजय आटोळे यांनी हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग करून त्याचा शोध लावला. तळोदा नगरपालिकेच्या रुग्णालयातील कक्षसेवक चरणदास किसनलाल लांजेवार (मूळ रा. भंडारा) यांचा हेमंत एकुलता एक मुलगा. १९ सप्टेंबर २००७ रोजी हेमंत कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाला. सात वर्षांत त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
तपास अधिकारी आटोळे यांनी या प्रकरणाच्या १०० पानांच्या अहवालाचा अभ्यास केला. हेमंतचा मित्र सचिन काहीतरी लपवित असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी उलट चौकशी केल्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वीच हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग केल्याचे सांगितले़ त्यानंतर आटोळे यांनीही फेसबुकवरून हेमंतशी चॅटिंग सुरू केली. त्याचा मोबाइल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. हेमंतने तो नागपुरात असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर त्याने फोन घेणे बंद केले. त्यामुळे आटोळे यांनी थेट नागपूर गाठले आणि हेमंत तेथे एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करीत असल्याचे त्यांना आढळले. हेमंतला घेऊन ते शिरपूरला आले. हेमंतला भेटल्यानंतर आपला बेपत्ता मुलगा परत आलाय, यावर लांजेवार पती-पत्नीचा विश्वासच बसत नव्हता. (प्रतिनिधी)

माझ्या वडिलांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांच्यावर माझ्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजा पडू नये, म्हणून मी घरातून निघून गेलो होतो. आई-वडिलांसमोर परत कसे यावे, हे मला समजत नव्हते. माझे चाळीसगावचे मित्र सचिन माळी व सुरज चौधरी यांच्याशी मी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होतो. - हेमंत लांजेवार

Web Title: Finding missing youth on Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.