शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम वाऱ्यावर
By Admin | Published: August 23, 2016 01:53 AM2016-08-23T01:53:42+5:302016-08-23T01:53:42+5:30
राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही.
मुंबई : राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षी आक्रमक झालेला शिक्षण विभाग यंदा मात्र उदासीन भूमिकेत दिसत आहे.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि संघटनांची मदतही शासनाने घेतली होती. मात्र, यंदा ठोस कार्यक्रमाची घोषणा झाली नसल्याने हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचा आरोप संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद आडेवार यांनी केला आहे.
गेल्या वर्षी सुमारे ६० हजार शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा शासनाने केला होता. मात्र, त्यातील ५० टक्के मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सरकारला आणता आले नाही, असे आडेवार यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, शासनाने शोधलेल्या शाळाबाह्य मुलांचे नेमके काय झाले? त्यांच्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू आहे? या संदर्भातील अहवाल अद्याप जाहीर केलेली नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने मागितलेल्या अहवालात सरकारला शाळाबाह्य मुलांची नेमकी आकडेवारी आणि या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी काय उपाययोजना करणार? याची माहिती सादर करावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाला दोन आठवडे पूर्ण होत आले असूनही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे नेमके काय करायचे आहे? असा सवालही मुकुंद आडेवार यांनी केला आहे.