बॉटूलिझम विषबाधेवर उपाय सापडेना
By admin | Published: February 9, 2016 02:12 AM2016-02-09T02:12:30+5:302016-02-09T02:12:30+5:30
साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने
- रवींद्र सोनावळे , शेणवा
साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने पशुधन अधिकारी हताश झाले आहेत.
शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर सलग तिसऱ्या वर्षी बॉटूलिझम विषबाधेने थैमान घातले आहे. जनावरांमध्ये क्षरांची कमतरता, पुरेसा खुराक नसणे, मयत जनावरे उघड्यावर टाकणे, कुजलेल्या हाडातील व पालापाचोळ्यातील बॉटूलिझम विष मोकाट जनावरांनी खाणे, कुजलेले आंबे खाणे, पुरेसे पोटभर पाणी न मिळणे, ही या विषबाधेची मूळ कारणे असून गुरांचे पायबळ जाणे, ताकद कमी होणे, शेपटी लुळी पडणे, चालता न येणे, उठता न येणे, भूक मंदावणे, लाळ सांडणे, अंग गार पडणे, पाय व शेपटीला सुई टोचल्यास वेदना न होणे, ही विषबाधेची लक्षणे आहेत. या विषबाधेने २०१३-१४ मध्ये चिलरवाडीतील ८८ जनावरे मृत पावली होती. संबंधित शेतकऱ्यांना आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत न्युकलियास बजेटमधून बैल- सात हजार, गाय- पाच हजार व वासरू- दोन हजार याप्रमाणे अर्थसाहाय्य केले होते. तसेच २०१४-१५ साली चिंद्याचीवाडी येथील ४० जनावरे मृत पावली आहेत. त्यांना अजूनही भरपाई मिळाली नसून १५ डिसेंबर २०१५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या दोन महिन्यांत लाख्याचीवाडी, मधलीवाडी व रानविहीर येथील यशवंत लाखे ९, विठ्ठल लाखे ५, मंगल भामरे ४, संजय भारमर १, मनोहर लाखे १ , नवसू भगत २, सुभाष शिरकंडे २, तुकाराम बरतड १, विठ्ठल मुंढे १, हिरामण लाखे २, जयराम मेंगाल १, शंकर भगत १ या १२ आदिवासी शेतकऱ्यांची ३० जनावरे मृत पावली आहेत. यातील १६ जनावरांचे पोस्टमार्टम करून त्यांचे नमुने चौकशीसाठी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाकडे पाठविले आहेत.
या प्रकारच्या विषबाधेवर कोणतीही लस अथवा औषधोपचार उपलब्ध नसल्याने उपचाराविना लागण झालेली जनावरे १२ तासांच्या आत मृत पावतात.
- डॉ .ए.पी. पाटील,
पशुधन विकास अधिकारी,
पं.स. शहापूर